भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील क्रिकेटपटूंची अनेकदा तुलना केली जाते. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा युवा खेळाडू बाबर आझम या दोघांच्या खेळाची आणि फलंदाजीची अनेकदा तुलना होते. काही दिवसांपूर्वी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मुडी याने ‘ तुम्हाला विराट कोहली उत्तम फलंदाज वाटत असेल, तर बाबर आझमची फलंदाजी नक्की बघा’, असे मत नोंदवले होते. दुसरीकडे ‘विराटच सर्वोत्तम फलंदाज आहे. बाबर आझम त्याच्या आसपासही नाही,’ असे मत पाकचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ याने व्यक्त केले. पाकिस्तान संघाचा नवा कर्णधार बाबर आझमने तुलना करायचीच असेल तर पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंशी करा असे वक्तव्य केले. त्याच्या या वक्तव्यावर पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं जोरदार टीका केली.
‘तुम्हाला माझी कोणाशी तुलना करायचीच असेल, तर विराटपेक्षा पाकिस्तानच्या महान खेळाडूंशी तुलना करा. जावेद मियांदाद, युनिस खान, इंझमाम उल हक असे महान खेळाडू होऊन गेले. त्या महान खेळाडूंशी जर माझी तुलना करण्यात आली, तर मला अधिक आनंद होईल. यशाचा मला गौरव झाल्यासारखे वाटेल,’ असे आझमने टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना म्हटले आहे. कोहलीपेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या बाबरला कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी दीर्घ पल्ला गाठायचा आहे. कोहलीच्या खात्यात सध्या ७० आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद झाली. बाबरची १६ आंतरराष्ट्रीय शतके आहेत.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज रशीद लतिफ यानं एका मुलाखतीत बाबर आझमला घरचा आहेर दिला. त्यानं म्हटले की,''कोणत्याही खेळाडूची तुलना त्याच्या समकालीन खेळाडूशीच केली जाऊ शकते. जसं की बाबर आणि विराट कोहली, जो रुट आणि केन विलियम्सन यांची तुलना.. बाबरनं हे समजून घ्यायला हवं की पाकिस्तानी दिग्गजांशी तुलना केली जाईल, इतका तो मोठा झालेला नाही. पाकिस्तानी दिग्गजांशी तुलना केली जावी, असं त्याला वाटते हे ऐकून बरं वाटलं. पण, हे त्याचं विधान नाही, त्याला असं विधान करण्यास सांगितले गेले आहे.''
बाबरमध्ये महान खेळाडू बनण्याची क्षमता आहे, असेही लतिफनं कबुल केलं. तो म्हणाला,''बाबरनं अल्पावधित मोठं यश मिळवलं आहे आणि त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यानं परदेशात जाऊन धावांचा पाऊस पाडला आहे. कोहलीसोबत त्याची तुलना होते कारण की त्यात तो दम आहे.''