मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीरात रॅली काढणार आहेत. पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहीद आफ्रिदीही या रॅलीत सहभागी होणार आहे. आफ्रिदीनं ट्विटरवर या रॅलीत सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन केले आहे. आफ्रिदीच्या या ट्विटला पाकिस्तानातील एका महिला पत्रकाराने सडेतोड उत्तर दिले आहे. नायला इनायत असे त्या पत्रकार महिलेचे नाव असून तिने आफ्रिदीला श्रीनगरमध्ये जाऊन रॅली घेण्याचे आव्हान केले आहे.
भारतीय जनता पार्टीनं जम्मू-काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे 370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. त्याच्या निषेधार्थ इम्रान खान ही रॅली काढणार आहेत. या रॅलीद्वारे खान हे काश्मीरी जनतेचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. इम्रान खान यांनी ट्विट केले की,''शुक्रवार 13 सप्टेंबरला मी मुझफ्फराबाद येथे मोठी रॅली काढणार आहे. या रॅलीद्वारे भारतव्याप्त काश्मीरमध्ये काय चालले आहे, याची माहिती जगाला द्यायची आहे. पाकिस्तानी काश्मीरी जनतेच्या पाठीशी आहे.''