Pakistan Players Fitness: मागील काही काळापासून क्रिकेटपटूंच्या दुखापतीची समस्या सातत्याने तोंड वर काढत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू लष्कराच्या जवानांसोबत प्रशिक्षण घेत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू लष्कराच्या जवानांसोबत प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत. (Pakistan Cricket Board) आगामी काळात होणारा ट्वेंटी-२० विश्वचषक आणि द्विपक्षीय मालिकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे शिलेदार काकुल, अबोटाबाद येथील फिटनेस शिबिरात सहभागी झाले. त्यांनी आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षण घेतले. (Pakistan Team) यावेळी खेळाडूंचा धावण्याचा सराव घेण्यात आला. २९ खेळाडू या सराव सत्रात सहभागी झाले असल्याची माहिती बोर्डाने दिली.
खरं तर प्रशिणाच्या दुसऱ्या दिवशी २ किमी धावण्याचा सराव घेण्यात आला. प्रत्येक खेळाडूला हे अंतर १० मिनिटांत गाठणे बंधनकारक होते. पण पाकिस्तानचा यष्टीरक्षक आझम खान हे अंतर गाठू शकला नाही. तो २० मिनिटांत केवळ १.५ किमी धावू शकल्याने त्याची फिटनेस चाचणी फेल झाली. पाकिस्तानच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिझवान आणि नसीम शाह यांनी ९ मिनिटांत हे अंतर गाठले. मोहम्मद नवाजला २ किमी अंतर गाठताना घाम फुटला पण त्याने ९ मिनिटे ५७ सेकंदात कसेबसे अंतर गाठले.
आझम फिटनेस टेस्टमध्ये फेल
माजी कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सैय अयुब, फखर झमान, साहिबजादा फरहान, हसीबुल्ला, सौद शकील, उस्मान खान, मोहम्मद हारिस, सलमान अली अगा, आझम खान, इफ्तिखार अहमद, इरफान खान नियाझी, शादाब खान हे खेळाडू प्रशिक्षण सत्रात सहभागी झाले होते. तसेच इमाद वसिम, उसामा मीर, मोहम्मद नवाज, मेहरान मुमताज, अबरार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद अली, झमान खान, मोहम्मद वसीम ज्युनियर, आमिर जमाल, हारिस रौफ आणि मोहम्मद आमिर यांचा देखील सहभाग होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, पाकिस्तान लष्कराच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आगामी काळात होणारा ट्वेंटी-२० विश्वचषक, न्यूझीलंडविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका, आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका यासाठी पाकिस्तानी संघातील खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली.