Join us  

भारताचे डावपेच, पण फायदा बाबर आजमचा; वर्ल्ड कपपूर्वी धक्का देण्याची संधी गमावली

IND vs AUS 3rd ODI : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा वन डे सामना उद्या रायपूर येथे खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 11:24 AM

Open in App

IND vs AUS 3rd ODI : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा वन डे सामना उद्या रायपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा केवळ औपचारिक राहिला आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या या शेवटच्या सामन्यात भारताला पुन्हा एकदा तयारीची चाचपणी करण्याची संधी आहे. विश्रांतीनंतर रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव संघात परतले आहेत. त्यात शुबमन गिल व शार्दूल ठाकूर यांना विश्रांती दिली गेली आहे. वर्कलोड मॅनेज करण्यासाठी संघ व्यवस्थापनाने हे डावपेच आखले, परंतु त्याचा फायदा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याला होताना दिसतोय.

भारताचा सलामीवीर शुभमन गिलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विश्रांती दिल्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम वन डे फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये गिलने ७४ आणि १०४ धावांची खेळी केली. या मालिकेत शुबमनला आयसीसी वन डे क्रमवारीत बाबरला मागे टाकण्याची सुवर्ण संधी होती. त्याने राजकोटमधील वन डेमध्ये आणखी एक मोठी धावसंख्या उभारली असती तर तो नंबर १ फलंदाज बनला असता.   

आयसीसी क्रमवारीतील भारतीय सलामीवीर ८१४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि बाबर ४३  रेटिंग गुणांनी (८५७ रेटिंग गुण) आघाडीवर आहे. शुबमनने पहिल्या वन डे त ६३  चेंडूत ७४ धावा केल्या आणि दुसऱ्या सामन्यात ९७ चेंडूत १०४ धावांची शानदार खेळी केली.  तिसऱ्या सामन्यात त्याने आणखी एक मोठी खेळी केली असती तर तो वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी नंबर १ फलंदाज बनला असता.   

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिलबाबर आजमआयसीसी