India vs Pakistan, Asia Cup 2023 | कोलंबो : सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना स्थगित करण्यात आला. त्यामुळे आजचा सामना राखीव दिवशी अर्थात सोमवारी खेळवला जाणार आहे. सामना स्थगित झाल्याचे घोषित झाल्यानंतर पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीने जसप्रीत बुमराहला एक खास गिफ्ट दिलं. बुमराह अलीकडेच बाप झाला आहे, त्यामुळे आफ्रिदीनं भारतीय गोलंदाजाला एक गिफ्ट देत ज्युनिअर बुमराहच्या आगमनासाठी त्याचे अभिनंदन केले.
४ सप्टेंबरला बुमराहची पत्नी संजना गणेसन हिने गोंडस मुलाला जन्म दिला. बुमराहची पत्नी संजना गणेसन हिने गोंडस मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव अंगद असं ठेवण्यात आलं आहे. बुमराहनं बाळाच्या हाताचा फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली होती. "आमचं छोटं कुटुंब मोठं झालं आहे आणि आम्हाला कल्पनेपेक्षा जास्त आनंद होत आहे. आम्ही आमच्या लहान मुलाचं, अंगद जसप्रीत बुमराहचं जगात स्वागत केलं. आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या जीवनातील या नवीन अध्यायाची सुरूवात करत आहोत", अशा आशयाचं कॅप्शन बुमराहनं दिलं होतं. आता 'बाप'माणूस जसप्रीत बुमराहचं पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजानं अभिनंदन केलं आहे. बुमराहला गिफ्ट देताना शाहीन म्हणाला की, तुझ्या मुलाच्या जन्माबद्दल तुझं आणि तुझ्या पत्नीचं खूप खूप अभिनंदन. देव त्याला सदैव आनंदी ठेवो आणि तोही तुझ्यासारखा होवो. यानंतर बुमराहनं शाहीनचं आभार देखील मानले.
कोण आहे बुमराहची पत्नी संजना गणेसन?जसप्रीत बुमराह १५ मार्च २०२१ ला स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेसन हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला. संजना गणेसन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरिंग केले आहे. संजनाने २०१९च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. सिम्बॉससिस इंस्टीट्यूटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं. त्यात तिने गोल्ड मेडल पटकावलं. त्यानंतर २०१३-१४मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केलं.
भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाची बॅटिंग पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना स्थगित करण्यात आला. रोहित शर्मा (५६) आणि शुबमन गिल (५८) यांनी अप्रतिम खेळी करत पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह या एकाही त्रिकुटाला सुरूवातीच्या षटकांत बळी घेण्यात यश आले नाही. दरम्यान, पावसाच्या कारणास्तव सामना थांबवण्यात आला असून भारताने २४.१ षटकांपर्यंत २ गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावा केल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे सोमवारी इथूनच सामन्याची सुरूवात केली जाईल.