पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रावळपिंडी स्टेडियमवर कसोटी सामना अनिर्णीत राहिला. या कसोटी सामन्यातील तीन दिवस पावसानं वाया घालवले असले तरी अखेरच्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. पाकिस्तानचा फलंदाज अबीद अली यानं हा विश्वविक्रम केला. त्यानं श्रीलंकेच्या 6 बाद 308 धावांच्या प्रत्युत्तरात शतकी खेळी करताना हा विक्रम नावावर केला. अबीदचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता आणि त्यात त्यानं पहिले कसोटी शतक झळकावलं. त्याच्या या खेळीनं आतापर्यंत कुणालाही न जमलेल्या विश्वविक्रमाची नोंद केली, असा दावा कालपर्यंत केला जात होता. पण, अबीदच्या आधी म्हणजे 1982साली इंग्लंडच्या एका महिला क्रिकेटपटूनं हा विश्वविक्रम नोंदवला होता.
प्रथम फलंदाजीला आलेल्या लंकेनं पहिला डाव 6 बाद 308 धावांवर घोषित केला. सामन्याचे पहिले तीन दिवस लंकेच्या फलंदाजांना फलंदाजी करायला मिळाली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या तीन दिवसांत केवळ 91.5 षटकांचा सामना झाला. चौथ्या दिवसाचा खेळ झालाच नाही. त्यामुळे पाचव्या दिवशी लंकेनं डाव घोषित केला. लंकेकडून धनंजया डी सिल्वानं नाबाद 102 धावा केल्या. कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( 59) आणि ओशादा फर्नांडो ( 40) यांनी योग्य साथ दिली. पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी अबीद अली आणि बाबर आझम यांनी तुफानी खेळी केली. अबीदनं शतकी खेळी करताना विक्रम नोंदवला. पाकिस्ताननं 2 बाद 252 धावा करून सामना अनिर्णीत राखला. आझमनेही नाबाद 102 धावा केल्या. अबीदनं नाबाद 109 धावा केल्या.