नवी दिल्ली - भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 2007 च्या एकदिवसीय सामन्यात गौतम गंभीरने शाहिद आफ्रिदीला चांगलंच सुनावलं होतं. या सामन्यात धाव घेताना गौतमने आफ्रिदीला धक्का दिला होता. मात्र, धक्का देण्याचं योग्य कारण सांगत गौतमने आपली बाजू मांडली होती. आफ्रिदी जाणीवपूर्वक मध्येच उभारल्यामुळे आफ्रिदीवर गौतम चाल करुन गेला होता. गौतम जरी विस्मृतीत गेला असला तरी, भारतीय चाहते अन् 'आफ्रिदीलाही गौतमचा तो 'दे धक्का' आज आठवल्याशिवाय राहणार नाही.
कानपूर येथे 2007 च्या चॅम्पियन ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात गौतम अन् आफ्रिदाचा वाद रंगला होता. या सामन्यात भारताचे 95 धावांवर 2 गडी बाद झाले होते. त्यावेळी गंभीर फलंदाजी करत होता, तर गोलंदाज होता शाहिद आफ्रिदी. एकोणवीसव्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन आफ्रिदी धावला. गौतमने पुढे येऊन आफ्रिदीचा हा चेंडू टोलवला. गौतमने मारलेला चेंडू तीन टप्पे खात सीमापार गेला. त्यानंतर षटकातील आफ्रिदीच्या पुढील चेंडूवर गौतमने बचावात्मक फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चेंडू स्लीपवर उभ्या असलेल्या खेळाडूकडे गेला. त्यामुळे गौतमने धाव घेण्यासाठी युवराजला कॉल देत एक धाव पूर्ण केली. पण, यावेळी धावताना गौतमचा धक्का आफ्रिदीला लागला. धावपट्टीवर आफ्रिदी उभारल्यामुळे गौतमने त्यास हा धक्का दिला होता. त्यानंतर, आफ्रिदी गौतमला काहीतरी बोलला. मात्र, गौतमनेही आफ्रिदीचीच चूक असल्याचे सांगत त्याला झापले. विशेष म्हणजे पंचांनीही गंभीरला बोलावून याबाबत जाब विचारला होता. पण, तेथेही गंभीरने आपली बाजू ठामपणे मांडली. तसेच आफ्रिदी धावपट्टीवर उभा असल्याने चूक आफ्रिदीचीच असल्याचे गौतमने म्हटलं होतं. गौतमच्या या भूमिकेचे भारतीय चाहत्यांनी कौतूक केले होते. तर, शाहिद आफ्रिदीवर अनेक चाहत्यांनी आगपाखड केली होती.