ICC Men's Player Rankings -आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदील राशिद हा ट्वेंटी-२० गोलंदाजांमध्ये नंबर १ बनला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजम याने वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत शुबमन गिलला मागे टाकून पुन्हा नंबर १ स्थान पटकावले आहे. इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि तेथे राशिदने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने अफगाणिस्तानच्या राशिद खान व भारताच्या रवी बिश्नोई यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. बिश्नोईला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत संध न मिळाल्याने त्याचे नंबर वन स्थान गेले.
ट्वेंटी-२० क्रमवारीत गोलंदाजांत नंबर वन स्थान पटकावणारा राशिद हा इंग्लडचा ग्रॅमी स्वॅन याच्यानंतर पहिलाच खेळाडू आहे. याचा अर्थ मागील तीन आठवड्यात ट्वेंटी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत नंबर वन स्थानावर तीन वेगवेगळे खेळाडू विराजमान झाले आहेत. वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकिल होसेन तीन स्थानाच्या सुधारणेसह सहाव्या आणि दक्षिण आफ्रिकेचा तब्रेझ शम्सी ३ स्थान सुधारणेसह नवव्या क्रमांकावर आला आहे. वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रेंडन किंग ( सहाव्या क्रमांकावर), निकोलस पूरन ( १२ ), रोव्हमन पॉवेल ( २३ ) आणि कायले मेयर्स ( ३३) यांच्याही क्रमवारीत सुधारणा झाली आहे. भारताचा सूर्यकुमार यादव अव्वल स्थानावर कायम आहे, तर इंग्लंडच्या फिल सॉल्टने २०व्या स्थानावर झेप घेतली आहे.
वन डे क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबरने ८२४ रेटिंग पॉईंटसह अव्वल स्थानावर आला आहे. शुबमन गिलला आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत विश्रांती दिली गेली आणि त्यामुळे तो ८१० रेटिंग पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर सरकला आहे.