Join us  

Babar Azam : "भारतातील आमचं स्वागत पाहून घरी असल्यासारखं वाटलं", बाबर आझमनं मानलं आभार

भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार असून यासाठी देशभरातील संघ भारतात दाखल झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 3:04 PM

Open in App

५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार असून यासाठी देशभरातील संघ भारतात दाखल झाले आहेत. आज या स्पर्धेच्या तोंडावर 'कॅप्टन्स डे'च्या माध्यमातून सर्व संघाचे कर्णधार आपापली रणनीती आणि मतं मांडत आहेत. खरं तर पाकिस्तानी संघ सात वर्षांनंतर भारतात आला आहे. बाबर आझमच्या संघाने प्रथम लाहोर ते दुबई असा प्रवास केला. दुबईहून पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबाद विमानतळावर दाखल झाला. शेजाऱ्यांचे हैदराबाद विमानतळावर धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. याबद्दल बोलताना कर्णधार बाबर आझमने भारतीयांचे आभार मानले.

'कॅप्टन्स डे'मध्ये बोलताना बाबरने म्हटले की, भारतात ज्या पद्धतीनं आमचं स्वागत करण्यात आलं ते अप्रतिम होतं. भारतात आदरातिथ्य खूप उत्कृष्ट आहे, आम्हाला इतकी अपेक्षा देखील नव्हती. आम्हाला आम्ही घरी असल्याचा भास होत होता. तसेच पाकिस्तानची गोलंदाजी ही आमची मजबूत बाजू असल्याचे पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने सांगितले. 

"भारतात आल्यावर हैदराबाद विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत जोरदार स्वागत झालं. पाकिस्तानातील चाहते इथे आले असते तर आणखी मजा आली असती. भारतीय चाहत्यांनी देखील पाठिंबा दिला, असाच पाठिंबा मिळत राहील अशी आशा आहे. हैदराबादची बिर्याणी खूप चांगली होती", असेही बाबरने सांगितलं. 

दरम्यान, २७ तारखेला पाकिस्तानच्या संघाचे हैदराबाद विमानतळावर दणक्यात स्वागत करण्यात आले. बाबर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या संघासोबत आला आहे. या आधी २०१६ मध्ये पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय संघ भारतीय भूमीत उतरला होता. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाला. कारण बाबरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला व्हिसा मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे त्याच्या संघाला भारतात पोहोचण्यास वेळ लागला. म्हणून दुबईत होणारे पाकिस्तान संघाचे शिबिरही रद्द करण्यात आले.

विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी. 

राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपबाबर आजमपाकिस्तानभारत