India vs Pakistan : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतल्याने, अनेकांना राग आलाय. पाकिस्तानचे माजी खेळाडू टीका करताना दिसत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही सुरुवातीला ( PCB) तांडव केला, परंतु BCCI समोर त्यांना झुकावे लागले. आशिया चषक स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार ४ सामने पाकिस्तानात व ९ सामने श्रीलंकेत अशी होणार आहे. पण, पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद ( Javed Miandad) याला हे काही पटलेलं नाही आणि त्यानं पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.
पाकिस्तानचं क्रिकेट हे भारतापेक्षा सरस आहे. भारतीय संघाला इथे यायचं नसेल तर त्यांनी नरकात जावं. पाकिस्ताननेही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात जाण्यास नकार द्यायला हवा, असे जावेद मियाँदाद म्हणाला. आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार भारत-पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. पण, ६६ वर्षीय मियाँदाद याने टीम इंडियावर निशाणा साधला आहे.
''पाकिस्तानचा संघ २०१२ आणि २०१६ मध्ये भारतात गेला होता, आता भारतीय संघाची इथे यायची वेळ आहे. जर निर्णय घेणे माझ्या हातात असते, तर मी भारतात खेळायला गेलोच नसतो, मग तो वर्ल्ड कप असला तरी चालेल. आम्ही नेहमी त्यांच्याविरुद्ध खेळायला तयार असतो, परंतु त्यांच्याकडून तसा रिस्पॉन्स मिळत नाही,'' असेही तो म्हणाला.
त्याने पुढे दावा केला की, पाकिस्तान क्रिकेट हे भारतापेक्षा मोठे आहे. आम्ही आजही अव्वल दर्जाचे खेळाडू घडवतो. त्यामुळे आम्ही जरी भारतात गेलो नाही, तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. भारतीय संघ २००८मध्ये पन्नास षटकांच्या आशिया चषक स्पर्धेसाठी शेवटचा पाकिस्तानात गेला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विदेशीय मालिका झाल्याच नाहीत. ''मी नेहमी म्हणतो की कोणी शेजारी निवडू शकत नाही, म्हणून एकमेकांना सहकार्य करून जगणे चांगले. मी नेहमीच म्हटलं आहे की क्रिकेट हा एक खेळ आहे जो लोकांना एकमेकांच्या जवळ आणतो आणि देशांमधील गैरसमज व तक्रारी दूर करू शकतो,''असेही तो म्हणाला.