Haris Rauf Fan Video : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील खराब कामगिरीमुळे पाकिस्तानी संघ चाहत्यांसह त्यांच्या देशातील माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे. पाकिस्तानला साखळी फेरीतील चारपैकी दोन सामने गमवावे लागले. अमेरिकेसारख्या नवख्या संघाने शेजाऱ्यांचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. एकिकडे पाकिस्तानच्या खेळाडूंवर टीका होत आहे, तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज हारिस रौफने टीकाकारांना पुन्हा एकदा आमंत्रण दिल्याचे दिसते. सध्या सोशल मीडियावर हारिसचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पाकिस्तानी चाहता त्याला शिवीगाळ करतो अन् त्याचा राग अनावर होतो. मात्र, संबंधित चाहता भारतीयच असावा असा दावा करत हारिसने कॅमेऱ्यासमोर त्याला मारण्यासाठी कूच केली.
दरम्यान, आता प्रकरण शांत होताच हारिस रौफने प्रामाणिक कबुली दिली असून, शिवीगाळ करणारा चाहता पाकिस्तानचाच असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना हारिसने सांगितले की, जो कोणी शिव्या देत होता तो भारतीय नसून पाकिस्तानचा नागरिक होता. मी फ्लोमध्ये भारतीय असल्याचा दावा केला. खरे तर हारिसच्या या कबुलीनंतर चाहते त्याला लक्ष्य करत आहेत.
नेमके काय घडले?व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हारिस रौफचा एका चाहत्यासोबत वाद होत असल्याचे दिसते. यादरम्यान हारिस चांगलाच संतापलेला दिसत आहे. त्याच्यासोबत असेलली एक महिला त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. पण रागात असलेला हारिस पायातील चप्पल सोडून त्यांच्या चाहत्याच्या अंगावर धावून जातो. मात्र तिथे असलेल्या इतर लोकांनी त्याला वेळीच अडवले. त्यामुळे दोघांमध्ये कोणतीही हाणामारी झाली नाही. सुरुवातीला व्हिडीओमध्ये दोघांमध्ये काय बोलले गेले हे स्पष्ट ऐकू येत नाही. मात्र व्हिडीओच्या शेवटी त्यांचे बोलणे स्पष्टपणे ऐकू येत आहे.
हारिस त्याच्या चाहत्याला तू अपने बाप को गाली देता है... तू अपने बाप को गाली देता है... असे म्हणतो. त्यानंतर पुन्हा हारिस तेरा इंडिया नही है ये असे म्हणाला. हे सगळे सुरु असताना चाहता देखील मागे हटला नाही आणि त्याने पाकिस्तानी आहे असे ठामपणे सांगितले. यावर हारिसने, हे तुझ्या वडिलांनी हेच शिकवले आहे का? पाकिस्तानी असून शिव्या देत आहेस, असे म्हटले.