कराची : पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. अख्तरला पाकिस्तानच्या पंजाब प्रदेशातील त्याच्या मूळ गाव असलेल्या रावळपिंडीच्या नावावरून 'रावळपिंडी एक्स्प्रेस' म्हणून ओळखले जाते. खरं तर शोएब अख्तरने पाकिस्तानकडून खेळताना क्रिकेटमध्ये खूप नावलौकिक मिळवला आहे. तरीदेखील इतर काही खेळाडूंप्रमाणे त्यालाही चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती.
दरम्यान, शोएब अख्तरने आता एक मोठा गौप्यस्फोट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. अख्तरने सांगितले की, त्याला बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट यांच्या गॅंगस्टर (2005) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली होती. अख्तरने खुलासा केला की दिग्दर्शक महेश भट 2005 मध्ये गँगस्टरची स्क्रिप्ट घेऊन पाकिस्तानला गेले होते आणि त्याला चित्रपटाची ऑफर दिली होती, परंतु शोएब अख्तरने ही भूमिका साकारण्यास नकार दिला.
शोएब अख्तरचा मोठा खुलासा "मला वाटते की हे सर्व 2005 मध्ये सुरू झाले जेव्हा प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री मीराने मला सांगितले की, हिंदी चित्रपटांचे प्रख्यात दिग्दर्शक महेश भट मला भेटू इच्छित आहेत. मी कराचीत क्रिकेट शिबिरात गेलो होतो आणि ते चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन आले होते. गँगस्टर या चित्रपटात मी भूमिका करावी अशी महेश भट यांची इच्छा होती. ही एक उत्तम स्क्रिप्ट होती आणि मी नेहमीच चित्रपटांचा आनंद लुटला आहे, पण काही कारणास्तव मी ही भूमिका स्वीकारली नाही", असे शोएब अख्तरने अधिक सांगितले.
क्रिकेट माझे पहिले प्रेम - अख्तर चित्रपटाच्या ऑफरला नकार देण्याचे कारण सांगताना अख्तरने म्हटले, "पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्या मागे होते आणि त्यांनी मला बाहेर काढून टाकण्याची धमकी दिली होती. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आजूबाजूची लोक चित्रपटात भूमिका करण्याच्या विरोधात होते. तुला क्रिकेट खेळायचे असेल तर असे करू नकोस असा मला सल्ला दिला जात होता. दोन्ही पेशांना व्यवस्थितपणे सांभाळणे शक्य नाही. मी मोहसीन खानसारखे चित्रपट करत आहे, असे लोकांना वाटावे अशी माझी इच्छा नव्हती." लक्षणीय बाब म्हणजे बॉलिवूडकडून मला ऑफर येत होत्या पण क्रिकेट माझे पहिले प्रेम असल्याचे अख्तरने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"