नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांचा पुन्हा एकदा जळफळाट झाल्याचे पाहायला मिळाले. पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांच्याबाबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल होत असतात. पण यावेळी प्रकरण थोडे वेगळे आहे. कारण आता रमीझ राजा यांना इतरत्र कुठेही ट्रोल केले गेले नसून त्यांच्याच देशातील टीव्ही चॅनेलवर राजा यांची बोलती बंद झाली आहे. खरं तर पाकिस्तानी टीव्ही चॅनेलच्या अँकरनेच रमीझ राजा यांचा अपमान केला आहे.
...म्हणून झाले ट्रोल रमीझ राजा जेव्हा जेव्हा बीसीसीआय किंवा भारतीय क्रिकेटपटूंबद्दल बोलतात तेव्हा ते ट्रोल झाले आहेत. यावेळी त्यांनी भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीबद्दल असे काही वक्तव्य केले त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. पीसीबी अध्यक्ष विराट कोहलीच्या 71व्या शतकावरून नाराज आहेत. त्यांनी म्हटले की, "जेव्हा विराट कोहलीने आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले तेव्हा भारतात मोठा जल्लोष झाला होता. पण बाबर आझमने इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले तेव्हा त्याचा कमी स्ट्राईक रेट चर्चेचा विषय ठरला." एकूणच रमीझ राजा यांनी पाकिस्तानी चाहत्यांना सुनावले आहे.
आता रमीझ राजा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अँकर असे म्हणताना दिसत आहे की, कोहलीने 3 वर्षांनंतर शतक झळकावले म्हणून एवढा जल्लोष करण्यात आला. तसे नसते तर त्याला इतके महत्त्व दिले गेले नसते. यावर रमीज राझा म्हणतात, "काय बोलताय. त्याच्या सामन्यात चार वेळा झेल सुटले आणि तेही अफगाणिस्तानसारख्या संघाविरुद्ध. माझा मुद्दा असा आहे की पाकिस्तानी फलंदाजाने शतक झळकावले तर ते पुन्हा-पुन्हा आपल्या मीडियात का दाखवले जात नाही." रमीझ राजा यांनी बाबर आझमच्या खेळीचे कौतुक न करणाऱ्या पाकिस्तानी मीडियावर आक्षेप घेतला.
रमीझ राजा यांनी घेतलेल्या आक्षेपावर अँकरने सडेतोड उत्तर दिले. "ते चार झेल चुकणे याला मी निसर्गाचा नियम म्हणेन. कारण हा निसर्गाचा नियम आजकाल खूप प्रसिद्ध आहे." खरं तर निसर्गाचा नियम हा शब्द पाकिस्तानात यासाठी खूप प्रसिद्ध झाला आहे. कारण इंग्लंडविरूद्धची मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी हा शब्द प्रयोग केला होता.