बुलोवायो : पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाईल. कारण पाकिस्तानचा सलामीवीर फखर झामन पाकिस्तानचा पहिला द्विशतकवीर ठरला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात झामनने हा विक्रम केला आहे.
पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला यापूर्वी एकदाही द्विशतक पूर्ण करता आले नव्हते. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वरने यापूर्वी भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 194 धावांची खेळी साकारली होती आणि हीच पाकिस्तानच्या फलंदाजानी केलेली सर्वोच्च धावसंख्या होती.
झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात झामनने 47व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार लगावत द्विशतक पूर्ण केले. झामनने 148 चेंडूंमध्ये यावेळी द्विशतकाला गवसणी घातली. या सामन्यात झामनने 156 चेंडूंत 24 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 210 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. झामनच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 1 बाद 399 अशी धावसंख्या उभारली आहे.