मरीना इकबाल. हे नाव तसं क्रिकेटच्या जगात फार ओळखीचंही नाही. लोकप्रियही नाही. पण परवाच्या मंगळवारी एकाएकी तिचं नाव ट्विटरला ट्रेण्ड होऊ लागलं. हॅशटॅग ट्रेण्डिंग झाला आणि मग अनेकांनी शोधून पाहिलं की कोण ही मरीना इकबाल?तर मरीना एकेकाळी पाकिस्तानची क्रिकेटपटू होती. २०१७ म्हणजे अलीकडेच तिने निवृत्ती घेतली. सहा वर्षे तिने पाकिस्तानी संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं. ३६ एकदिवस सामने आणि ४२ टी-ट्वेण्टी सामने खेळून तिनं निवृत्ती जाहीर केली. मात्र २००९ ते २०१७ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अशीच तिची ओळख होती. विशेष म्हणजे निवृत्तीनंतर तिचं कॉमेण्ट्री बॉक्समध्ये पदार्पण झालं. विशेष यासाठी की ती पाकिस्तानातली पहिला महिला कॉमेण्टेटर. पुरुषांच्या क्रिकेट खेळात महिलेनं समालोचन करणं, टीकाटिप्पणी करणं हे कॉमेण्ट्री बॉक्सलाही जिथं फार रुचणारं नव्हतं तिथं मरीनाने एक उत्तम कॉमेण्टेटर म्हणून आपली ओळख निर्माण केली.पण पुरुषी खेळ म्हणून ओळख असलेल्या क्रिकेटमध्ये, विशेषत: भारतीय उपखंडातल्या सर्वच देशात महिलांना क्रिकेट कळतं हे अजूनही रुचलेलं नाही, मान्य नाही. वरकरणी महिला क्रिकेटला प्रोत्साहन दिलं जात असलं तरी ‘ते म्हणजे बायकांची भातुकली, त्यांना काय क्रिकेटचा रांगडा खेळ जमतो का?’ असाच एकूण अॅटिट्यूड. आणि त्याच छुप्या अॅटिट्यूडचं दर्शन अधनमधनं होत असतंच. तेच मरीनाच्याही संदर्भात झालं.पाकिस्तानात सध्या राष्ट्रीय पातळीवरची पाकिस्तान राष्ट्रीय टी ट्वेण्टी टुर्नामेण्ट सुरूआहे. मुलतान आणि रावळपिंडी या दोन शहरांत हे सामने होतात. त्यासाठी समालोचक म्हणून मरीना काम करते.तर झालं असं की कादीर ख्वाजा नावाच्या क्रीडा पत्रकाराने मंगळवारी एक ट्विट केलं, उर्दूमध्ये. सोबत मरीनाचे फोटोही होते. त्यात त्यानं लिहिलं की, क्रिकेटच्या पीचवर हिल्स घालून फिरणं अधिकृत आहे का? चालतं का असं वागलं तर?त्या ट्विटची बरीच चर्चा झाली. मात्र मरीनाने त्यावर उत्तर म्हणून ट्विट करत सांगितलं की, ‘अर्धवट माहिती धोकादायक असते. मी पीचजवळ गेले तेव्हा सपाट चपलाच घालून गेले होते, प्री मॅच चर्चा सुरूअसताना मात्र हिल्स घातले होते. मी पाकिस्तानची माजी खेळाडू आहे, मला क्रिकेटचे प्रोटोकॉल्स कळतात!’ - या ट्विटची, मरीनाच्या सडेतोड स्पष्टवक्तेपणाची बरीच चर्चा झाली आणि अनेकांनी विचारलंही जाहीरपणे की ही कोणती वृत्ती?
- Cricket Buzz»
- बातम्या»
- त्यानं ‘तिला’ जाहीर विचारलं, हिल्स घालून कुणी क्रिकेट पीचवर येतं का?; अन्...
त्यानं ‘तिला’ जाहीर विचारलं, हिल्स घालून कुणी क्रिकेट पीचवर येतं का?; अन्...
मरीना एकेकाळी पाकिस्तानची क्रिकेटपटू होती. २०१७ म्हणजे अलीकडेच तिने निवृत्ती घेतली. सहा वर्षे तिने पाकिस्तानी संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 4:25 AM