नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानातून टीकेचे सूर उमटू लागले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही या निर्णयावर टीका करताना भारताशी सर्व व्यवहार तोडले आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही या निर्णयावर मनाला येईल ते बरळत आहेत. शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर आणि सर्फराज खान यांच्यानंतर आणखी एका पाकच्या माजी खेळाडूनं अकलेचे तारे तोडले आहेत.
काश्मीर मुद्यावर आफ्रिदीनं ट्विट केलं होतं की,''काश्मीरला संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाच्या आधारावर त्यांचे अधिकार द्यायला हवेत. सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार आहे. संयुक्त राष्ट्राची निर्मीती का केली गेली आहे आणि या प्रकरणात संयुक्त राष्ट्र झोपा काढत आहे का? काश्मीरात सातत्यानं मानवताविरोधी पावलं उचलली जात आहेत. त्याच्यावर लक्ष द्यायला हवे. डॉनल्ड ट्रम्प यांनीही या प्रकरणात मधस्थाची भूमिका पार पाडायला हवी.''
पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद म्हणाला होता की,'' आम्ही पाकिस्तानी काश्मीरी नागरिकांच्या पाठिशी आहोत. अल्लाहने त्यांच्यावरील दु:ख लवकरच दूर करावे अशी प्रार्थना करतो." रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने लिहिले की," बलिदानाचा अर्थ तूम्ही सांगितला. तुमच्या स्वातंत्र्यासाठी मी प्रार्थना करतो." त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने वादग्रस्त विधान केले आहे. त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करताना पाकिस्तानकडे असलेले अणुबॉम्ब हे केवळ दाखवण्यासाठी नाहीत, असा इशारा दिला.
पाकिस्तानमधील खेलशेल.कॉम या वेबसाईटनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मियाँदादचा व्हिडीओ शेअर केला. त्यात त्याला काश्मीर मुद्यावर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मियाँदाद म्हणाला,''तुमच्याकडे घातकी हत्यारं आहेत, तर जीव वाचवण्यासाठी त्याचा उपयोग करायला हवा. मोदी डरपोक आहे. आमच्याकडे असलेला अणुबॉम्ब हा फक्त दाखवण्यासाठी नाही, त्याचा उपयोग करून भारताला साफ करून टाकू.''
पाहा व्हिडीओ...