श्रीलंकेच्या धरतीवर १९ जुलैपासून महिलांच्या आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना गतविजेता भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्याच्या तोंडावर पाकिस्तानच्यामहिला संघाचा मुख्य प्रशिक्षक मोहम्मद वसिमने विविध बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना त्याने पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भर द्यायला हवा असे मत मांडले. खरे तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मागील वर्षी क्रांतिकारी निर्णय घेत करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण लागू केले.
BCCI च्या पावलावर पाऊल टाकावे...
पत्रकार परिषदेत बोलताना मोहम्मद वसिम म्हणाला की, भारताने पुरूष आणि महिला खेळाडूंना समान मानधन देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील असा विचार करायला हवा. पण, त्यांच्यासमोर इतर काही आव्हाने आहेत. क्रिकेटमध्ये समानता आणणे गरजेचे आहे. महिला खेळाडूंनाही चांगल्या सुविधा मिळायला हव्यात. यासाठी खूप काम करावे लागेल. पाकिस्तानच्या महिला क्रिकेटला पुढे नेण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट, मानधन, इतर सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर अधिक लक्ष द्यायला हवे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने समानता आणल्याशिवाय महिला क्रिकेट नव्या उंचीवर जाणार नाही.
जय शाह यांनी ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करताना म्हटले होते की, भेदभावाचा सामना करण्यासाठी BCCIने पहिले पाऊल टाकले आहे आणि त्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण लागू करत आहोत. क्रिकेटमधील समानतेच्या नवीन युगात जात असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे महिला खेळाडूंना देखील पुरूष खेळाडूंप्रमाणे मॅच फी दिली जाते.