Join us  

पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; लायनचे ५०० बळी पूर्ण; कांगारू ३६० धावांनी विजयी

चौथ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २३३ धावांवर घोषित करत पाकिस्तानपुढे ४५० धावांचे विशालकाय लक्ष्य ठेवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 5:51 AM

Open in App

पर्थ : आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत डब्ल्यूटीसी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला ३६० धावांनी चिरडले. या विजयासह फिरकीपटू नाथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये ओलांडलेला ५०० धावांचा टप्पा कांगारूंसाठी दुग्धशर्करा योग ठरला.

चौथ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २३३ धावांवर घोषित करत पाकिस्तानपुढे ४५० धावांचे विशालकाय लक्ष्य ठेवले. मात्र मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स या वेगवान त्रिकुटापुढे पाकिस्तानचा डाव अवघ्या ८९ धावांत संपुष्टात आला. नाथन लायननेही महत्त्वपूर्ण दोन बळी घेतले. मालिकेत १-० ची आघाडी घेताना, ३६० धावांनी विजयी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाने मायदेशात पाकिस्तानवर नोंदवलेला हा सलग १५ वा कसोटी विजय ठरला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सलामीवीर उस्मान ख्वाजाचे शतक अवघ्या १० धावांनी हुकले. ४ बाद १०७ अशी अवस्था असताना उस्मान ख्वाजा आणि मिशेल मार्श यांनी १२६ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात ६३ धावा करणारा मिशेल मार्श सामनावीर ठरला. तीन कसोटी सामन्यांमधील दुसरा सामना २६ डिसेंबर ‘बॉक्सिंग डे’ला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळविला जाईल.

वॉर्न, मॅग्रा क्लबमध्ये लायनचा समावेशपाकिस्तानच्या फहीम अशरफला पायचित बाद करत फिरकीपटू नाथन लायनने कसोटी क्रिकेटमधला आपला ५०० वा बळी पूर्ण केला. यासह आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी घेणारा लायन हा तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला. याआधी शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्रा यांनी हा पराक्रम केला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाल्याने संघसहकाऱ्यांनी लायनचे अभिनंदन केले.

संक्षिप्त धावफलकऑस्ट्रेलिया पहिला डाव : ११३.२ षटकांत सर्वबाद ४८७ धावा.पाकिस्तान पहिला डाव : १०१.५ षटकांत सर्वबाद २७१ धावा.ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : ६३.२ षटकांत ५ बाद २३३ डाव घोषित (उस्मान ख्वाजा ९०, मिशेल मार्श ६३, स्टीव्ह स्मिथ ४५). गोलंदाजी : खुर्रम शहजाद ३/४५, आमेर जमाल १/२८, शाहीन आफ्रिदी १/७६.पाकिस्तान दुसरा डाव : ३०.२ षटकांत सर्वबाद ८९ धावा (सौद शकील २४, बाबर आझम १४, इमाम-उल-हक १०). गोलंदाजी : जोश हेझलवूड ३/१३, मिचेल स्टार्क ३/३१, नाथन लायन २/१४, पॅट कमिन्स १/११.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया