Join us  

मोठे अपडेट्स : पाकिस्तान वन डे वर्ल्ड कप नाही खेळणार? त्यांच्या सरकारचं BCCI, ICC ला उत्तर

ODI World Cup : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानकडून खोड घातला जातोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 10:56 AM

Open in App

ODI World Cup : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानकडून खोड घातला जातोय... सुरुवातीला अहमदाबाद येथे खेळण्यास नकार देणारे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) चेन्नई आणि बंगळुरूवरील सामन्यांच्या अदलाबदलीसाठी हट्ट करत होते. बीसीसीआय आणि आयसीसीने त्यांचे सर्व हट्ट धुडकावून लावल्यानंतर आता PCB ने नवा खेळ सुरू केला आहे. पाकिस्तान सरकार परवानगी देतील, तेव्हा आम्ही वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येऊ, असं त्याचं म्हणणं आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत प्रथमच प्रतिक्रिया आली आहे. भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत संघाच्या सहभागाबाबत आम्ही मुल्यांकन करत असल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली आहे. PCBच्या या नखऱ्यांमुळे वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा होण्यास विलंब झाला आहे.  

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा सहभाग त्यांच्या सरकारच्या मान्यतेच्या अधीन आहे. पीसीबीने काही दिवसांपूर्वी सर्व सहभागी देशांना एक मसुदा वेळापत्रक जारी केल्यानंतर, आयसीसीला पत्र लिहिले होते की, याबाबत एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्या सरकारकडून निर्णय घ्यावा लागेल.  पाकिस्तानच्या मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ ४ जुलै रोजी होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रप्रमुखांच्या व्हर्च्युअल बैठकीसाठी भारतीय पंतप्रधानांकडून आमच्या पंतप्रधानांना अधिकृत निमंत्रण मिळाले आहे.” परराष्ट्र व्यवहार, मुमताज झहरा बलोच यांनी इस्लामाबादमध्ये सांगितले की,"समिटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले जाईल. आम्ही येत्या काही दिवसांत आमच्या सहभागाबाबत घोषणा करणार आहोत.'' 

"क्रिकेट आणि राजकारण यांची गुंतागुत होता कामा नये, अशी पाकिस्तानची भूमिका आहे. पाकिस्तानमध्ये क्रिकेट न खेळण्याचे भारताचे धोरण निराशाजनक आहे. आम्ही पाकिस्तानच्या सुरक्षेच्या परिस्थितीसह वर्ल्ड कप स्पर्धेतील आमच्या सहभागाशी संबंधित सर्व पैलूंचे निरीक्षण आणि मूल्यांकन करत आहोत. क्रिकेटपटू आणि आम्ही योग्य वेळी आमचे मत पीसीबीला देऊ,''असेही बलोच यांनी स्पष्ट केले.  

ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार २०२३ चा वर्ल्ड कप ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे २०१६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून पाकिस्तानने भारताचा दौरा केला नाही आणि तेव्हाही पाकिस्तान भारतात येण्याबाबत अनिश्चितता होती. पीसीबीने त्यांच्या खेळाडूंना पुरवल्या जाणार्‍या सुरक्षेबाबत भारत सरकारकडून स्पष्ट आणि सार्वजनिक आश्वासन न दिल्यास स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली होती. या वाटाघाटींमुळे अखेरीस भारत-पाकिस्तान सामना धर्मशाला येथून कोलकात्यात हलवावा लागला होता. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App