कराची : कोरोनाचा क्रिकेटला मोठा फटका बसला आहे. चार महिन्यांपासून जगभरात खेळाचे आयोजन ठप्प असून इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वाचे आयोजनदेखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. आयपीएल रद्द झाल्यास चार हजार कोटींचा तोटा बसणार आहे. हा तोटा टाळण्यासाठी बीसीसीआय सप्टेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आॅस्ट्रेलियात आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसी काय निर्णय घेते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी यंदा आशिया चषक पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार होईल, असे स्पष्ट केले. ही स्पर्धा आम्ही श्रीलंका किंवा यूएईत घेऊ, असेही त्यांनी सांगितले. ‘पाक संघ इंग्लंड दौºयावरून २ सप्टेंबर रोजी परतणार आहे. त्यामुळे सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्याच्या कालावधीत आशिया चषकाचे आयोजन करण्यासाठी योग्य असेल. पाकिस्तानात कोरोनाची रुग्णसंख्या सातत वाढत आहे. त्यामुळे श्रीलंका किंवा यूएई येथे आयोजन केलेले जाईल,’ असे वसीम खान बुधवारी पत्रकारांंशी बोलताना म्हणाले.
लॉकडाऊननंतर कमी कालावधीत विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करणे सोपे नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. दुसरीकडे आशिया चषकाचे यजमानपद मिळालेल्या पाकिस्तानने कोणत्याही परिस्थितीत आशिया चषकाचे आयोजन पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार होणारच, असा पवित्रा घेतला आहे. टी-२० विश्वचषक किंवा आशिया चषकाचे आयोजन ठरलेल्या वेळापत्रकानुसार झाल्यास बीसीसीआयला यंदा आयपीएल रद्द करावी लागू शकते. (वृत्तसंस्था)
>बीसीसीआयही सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात आयपीएलच्या १३ व्या पर्वाचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. याबद्दल बोलताना, आयपीएलचे आयोजन कधी होते, याविषयी मला माहिती नाही. त्याविषयी माहिती मिळताच चर्चा केली जाईल, पण आमच्यासाठी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात आशिया चषकाचे आयोजन करण्याचा पर्याय खुला असल्याचे खान यांनी स्पष्ट केले. २०२० आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले; मात्र भारताने पाकिस्तानात स्पर्धा होणार असल्याने त्यात सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळविण्याच्या पर्यायावर विचार सुरू होता. श्रीलंकेत आयोजन करण्यास अडचण येत असल्यास यूएईत स्पर्धेचे आयोजन होईल. दोन्ही देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असल्याचेही खान म्हणाले.
Web Title: Pakistan's obstacle in the way of IPL will be the Asia Cup in Sri Lanka or UAE
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.