नवी दिल्ली : रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 2022च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. इंग्लंडने पाच गडी राखून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि विश्वचषकावर नाव कोरले. पाकिस्तानच्या 8 बाद 137 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांत 5 बाद 138 धावा केल्या. आदिल राशिद, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, या गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर बेन स्टोक्सने 49 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकून नाबाद 52 धावा करून इंग्लंडचा विजय पक्का केला. पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या संघाला मोठा झटका बसला आहे. कारण संघाचा स्टार गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी आगामी 6 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.
पाकिस्तानच्या संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर फायनलच्या सामन्यात शाहिनला दुखापत झाली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिदी पुढील सहा ते सात महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. पीसीबीच्या वैद्यकीय मंडळाचे प्रमुख डॉ. सोहेल सलीम यांनी याबाबत माहिती दिली आहे.
शाहिन आफ्रिदी 6 महिने क्रिकेटला मुकणार
पाकिस्तानी वृत्तपत्र डाऊन न्यूजशी संवाद साधताना पीसीबी वैद्यकिय बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, "जर या दुखापतीचा परिणाम शाहिनला इतर अनेक दुखापतींच्या रूपात दिसून आला नाही, तरच तो पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये खेळण्यास सुरुवात करेल. अन्यथा त्याला 6 ते 7 महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागेल. पीसीबीच्या वैद्यकीय मंडळाने शस्त्रक्रियेद्वारे त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु शाहिन आगामी सहा ते सात महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे."
शाहीन आफ्रिदी बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत आहे. दुखापतीमुळे तो यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चषकातून बाहेर झाला होता. विश्वचषकापूर्वी त्याने पाकिस्तान संघात प्रवेश केला. तेव्हा शाहिन 60 ते 70 टक्के फिट असल्याचे सांगण्यात आले होते. टी-20 विश्वचषकातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो काही खास कामगिरी करू शकला नाही मात्र हळू हळू त्याने लय पकडली.
पाकिस्तानचा दुखापतीचा 'दे धक्का'
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 138 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना शाहिनला डायव्हिंग कॅच घेताना दुखापत झाली. नंतर 16व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या शाहिनला केवळ एक चेंडू टाकता आला. दुखापतीमुळे तो त्याचे षटक देखील पूर्ण करू शकला नाही. त्यानंतर या षटकातील उर्वरीत 5 चेंडू इफ्तिखार अहमदने टाकले आणि त्याचे षटक पूर्ण केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Pakistan's star bowler Shaheen Afridi will be away from international cricket for 6 months due to injury
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.