कराची : टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. सामन्यादरम्यान सलामीवीर मोहम्मद रिझवानने मैदानावरच नमाजपठण केले होते. याबाबत माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसने पाकिस्तानी चॅनलशी संवाद साधताना वादग्रस्त वक्तव्य केले होते.
‘रिझवानने ‘हिंदुंसमोर नमाज’ अदा केल्याने मला आनंद झाला? मैदानात हिंदू लोकांमध्ये नमाज अदा केली ते खूप खास होते.’ असे वकार म्हणाला. भारताच्या माजी खेळाडूंनी यावर नाराजी जाहीर करीत वकारला सुनावले. त्यानंतर वकार युनिसने माफी मागितली. वकारने ट्विट करत माफी मागितली. तो म्हणाला, ‘त्या उत्साहाच्या क्षणी मी असे काहीतरी बोललो ज्यामुळे अनावधानाने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मी यासाठी माफी मागतो. हे जाणीवपूर्वक झालेले नव्हते,’ असे वकारने स्पष्ट केले.
समालोचक हर्षा भोगले यांनी नाराजी जाहीर केली होती. ‘वकार युनूससारख्या माणसाचे रिझवानला हिंदूंसमोर नमाज अदा करताना पाहणे त्याच्यासाठी खूप खास होते, हे म्हणणे माझ्या आयुष्यातील सर्वात निराशाजनक आहे. आपल्यापैकी बरेचजण या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत; पण याबद्दल खूप त्रास होतो.’
‘अनावधानाने भावना दुखावल्या’पाकच्या विजयानंतर माझ्याकडून झालेली चूक गंभीर होती. खेळ तुमचा धर्म, रंग आणि वंशाचा विचार न करता सर्वांना एकत्र आणतो. माझ्या वक्तव्यामुळे अनावधानाने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या, यासाठी मी सर्वांची माफी मागतो. - वकार युनूस