कराची : भारतीय युवा क्रिकेटपटूंच्या जडणघडणीत अंडर-१९ संघाचे कोच राहुल द्रविड यांची भूमिका मोठी आहे. पाकिस्तानच्या युवा खेळाडूंचा खेळ उंचाविण्यासाठी द्रविडसारख्या गुरूची येथेही गरज असल्याचे मत पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीझ राजाने व्यक्त केले.
अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताकडून झालेल्या दणदणीत पराभवाबद्दल पाक संघाला धारेवर धरीत रमीझ पुढे म्हणाला, ‘पराभवाचे हे अंतर माझ्यासाठी आश्चर्यकारक नव्हतेच. भारताचे युवा खेळाडू कुठलेही दडपण सहन करण्यास सज्ज आहेत. त्यांना कोच द्रविडने तसे तयार केले आहे. काही भारतीय खेळाडूंचा खेळ पाहून मी फारच प्रभावित झालो. शुभमान गिल आणि अन्य शानदार खेळाडू या संघात आहेत. या खेळाडूंना घडविण्याचे श्रेय द्रविडला द्यायला हवे.’
भारतीय युवा खेळाडूंना द्रविडसारखा कोच आणि मेन्टर मिळणे ही मोठी बाब असल्याचे सांगून रमीझ पुढे म्हणाले, ‘केवळ क्रिकेट नव्हे तर आयुष्यात यशस्वी होण्याचे धडे द्रविडकडून या खेळाडूंना मिळत आहेत. स्वत:ला सज्ज कसे करावे, खेळात सुधारणा कशा कराव्यात आणि खेळाप्रति सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा, याची शिकवण कोच द्रविड खेळाडूंना देतात.’ (वृत्तसंस्था)
Web Title: Pakistan's young cricketers need a 'Guru' like Dravid - Rameez Raja
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.