पालघरमधील सामूहिक हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे. चोर समजून जमावाने तिघांची हत्या केल्याने राज्य सरकारबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत जमाव अत्यंत क्रुरपणे मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीर यानंही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना म्हणाले की, पालघरमधील सामूहिक हत्याकांडाचे प्रकरण अत्यंत घृणास्पद आहे. ज्या प्रकारे लोकांनी पोलिसांसमोर अक्षरश: काठ्यांनी मारहाण करुन हत्या केली. पोलीस काहीच करु शकले नाही. हे लज्जास्पद आहे. तात्काळ या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. पोलिसांवर आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का हा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेशी चौकशी केलीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, ''पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल,'' अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.