PAN Card, Kevin Pietersen: भारतात क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. भारतीय क्रिकेटर्सचा चाहतावर्गही खूप आहे. केवळ भारतीयच नव्हे तर विदेशी क्रिकेटर्सचाही खूप मोठा चाहतावर्ग भारतात आहे. त्यामुळेच अनेक विदेशी क्रिकेटपटू भारत दौरा करण्यास नेहमीच उत्सुक असतात. २००३ साली पहिल्यांदा आलेला इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनदेखील भारताच्या प्रेमात असून तो बरेचदा भारतात पर्यटनासाठी किंवा कामानिमित्त येतो. सोमवारी तो भारतात येणार आहे. पण या दरम्यान त्याचे PAN हरवल्याने त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली. त्यावर आयकर विभागाने (Income Tax Department) त्याच्या ट्वीटवर उत्तर दिले.
पीटरसनने ट्वीट केले की माझं पॅन कार्ड हरवलं आहे आणि मी सोमवारी भारतात येत आहे. मी ज्या कामासाठी भारतात येत आहे तेथे मला महत्त्वाचे दस्तावेज लागणार असून त्यात पॅन कार्डचीही गरज असणार आहे. मला कुणीतरी मार्गदर्शन करा की मला याबाबत कोणाकडे मदत मागावी लागेल, असं आवाहन त्याने चाहत्यांना केलं होतं. तसेच, त्या ट्वीटमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं होतं.
पीटरसनच्या या प्रश्नानंतर आयकर विभागाने त्याच्या या ट्वीटची दखल घेतली. आम्ही तुझी मदत करण्यास तत्पर आहोत. तुझ्याकडे जर PAN कार्ड डिटेल्स असतील तर पुढील लिंकवर जाऊन तो तुझ्या पॅन कार्डची आणखी कॉपी री-प्रिंट (Reprint) करून मागवू शकतोस, असं सांगत आयकर विभागाकडून त्याला मदतीचा हात पुढे करण्यात आला.
या ट्वीटरनंतर केविन पीटरसननेदेखील आयकर विभागाचे आभार मानले. तसेच, त्यांना ट्वीटरवर फॉलो करत भविष्यात मदत लागल्यास नक्की सहकार्य करावे अशी विनंतीही केली.