>> सुकृत करंदीकर
सन 1955 - पंडित जवाहरलाल नेहरु यांना एकदम झोपेतून उठवून नेऊन कोणी त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान सोहळ्यात उभं केलं नसेल. त्यांच्या नावाचा प्रस्ताव कोणत्याही माध्यमातून पुढं आला असला (आणि या प्रक्रियेत नेहरुंचा दुरायन्वये संबंध नव्हता, यावर माझा पूर्ण विश्वास आहे) तरी प्रत्यक्षात तो प्रदान करण्यापूर्वी नेहरू यांची संमतीही घेतलीच गेली नव्हती असं असू शकतं का? ही संमती घेतेवेळी पंडितजी नम्रतापूर्वक त्याला नकार देऊ शकले असते. बरं तो काळ असा होता की, नेहरू यांच्या इतक्याच तसेच त्यांच्यापेक्षाही अधिक योग्यतेच्या थोरांची उणीव या देशात अजिबातच नव्हती. त्यामुळं स्वतः देशाचे पंतप्रधान असताना स्वतःला 'भारतरत्न' म्हणवून गौरवून घेण्याचा मोह नेहरू यांना टाळता आला असता. ते 'भारतरत्न' आहेतच पण त्यांच्या पश्चात त्यावर शिक्कामोर्तब झालं असतं तर ते अधिक सन्माननीय झालं असतं. (Motera Stadium Renamed After PM Narendra Modi )
सन 2021 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'हनुमान' (म्हणजे मोदी 'राम' आहेत, असं नव्हे. 'स्वामीनिष्ठ', 'एकनिष्ठ' इतकाच मर्यादित अर्थ 'हनुमान'मधून घ्यावा.) देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधून घोषणा केली. त्यानुसार अहमदाबादचं मोटेरा क्रिकेट मैदान आता नरेंद्र मोदी स्टेडियम असं ओळखलं जाईल.
शहा यांनी थेट घोषणा केल्यावरच मोदींना हे नामकरण समजलं, असं घडलं असण्याची सूतराम शक्यता नाही. मोदींनीही ठामपणे म्हणायला हवं होतं की, "माझ्या हयातीत माझं नाव नको." पण तसं घडलं नाही. आता उद्या हे नेहरुंप्रमाणेच 'भारतरत्न' घ्यायलाही मोकळे झाले. सगळे एकाच माळेचे मणी.
अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव, राष्ट्रपतींनी केलं उद्घाटन
स्वतःच्याच हयातीत स्वतःची नावं सार्वजनिक वास्तुंना, संस्थांना देण्याची खोड गावपातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्वत्र दिसते. मागे पुणे परिसरात एका कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी गेलो होतो. एका इंटरनॅशनल स्कूलचा कार्यक्रम होता. ज्या साहेबांचं नाव त्या स्कूलला होतं तेच साहेब त्या कार्यक्रमात प्रमुख होते. अशी अनेक नावं गावगन्ना सापडतील. कदाचित या लोकांना भीती असावी की आपण आहोत तोवरच आपल्याला किंमत, आपण गेल्यावर कोण विचारतो? अनेकांच्या बाबतीत हे अगदी खरंही ठरतं. सत्ता, पद आहे तोवर किंमत अन्यथा कोणी पुसत नाही. पण खरं तर क्रीडा मैदानं शक्य तो त्या-त्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडू, संस्थां, क्रीडा प्रशासकांच्या नावानं ओळखली जायला हवीत.
मी पाहिलेल्या एमसीजी (मेर्लबोर्न), एससीजी (सिडनी), ईडन पार्क (ऑकलंड), वेस्टपैक (वेलिंगटन), ओल्ड ट्राफर्ड (मँचेस्टर), ट्रेंट ब्रीज (नॉटिंगहम), एजबॅस्टन (बर्मिंघम), ईडन गार्डन्स (कोलकाता) या एकाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानांना माणसांची नावं नाहीत. अपवाद लॉर्ड्सचा (लंडन). पण थॉमस लॉर्ड्स हा स्वत:च क्रिकेटर होता आणि 1787 मध्ये स्वत: जेव्हा हे मैदान त्यानं खुलं केलं तेव्हा ते मेरीलबोन क्रिकेट क्लबचं ग्राऊंड म्हणूनच ओळखलं जात होतं.
देशात क्रिकेटचे सर्वात जास्त चाहते गुजरातमध्ये, सुनील गावस्करांचं विधान
अहमदाबादच्या क्रिकेट मैदानाचं नामकरण करताना एखाद्या गुजराती क्रिकेटपटूचं नाव देता आलं असतं. अंशुमन गायकवाड, किरण मोरे चालले असते. खरं तर पॉली उम्रिगर, चंदू बोर्डे, झहीर खान हे महाराष्ट्राचे खेळाडूसुद्धा गुजरातमधल्या संघांकडून खेळलेले आहेत. अगदी इरफान पठाणसुद्धा चालला असता. खरं तर भाजपवाल्यांसाठी हे नाव आणखी राष्ट्रवादी होतं. कारण. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर थेट पाकिस्तानात घुसून (पक्षी - पाकिस्तानात खेळताना) इरफाननं कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात चक्क हॅटट्रीक घेत तीन पाकिस्तानी फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडलं होतं. असो.
मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव दिल्यानं हार्दिक पटेलनं व्यक्त केला संताप
अमित शहा म्हणाले त्याप्रमाणं मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी या मैदानाचं स्वप्न पाहिलं होतं. बाकी काही असो. मैदान मात्र अत्यंत देखणं आणि जागतिक दर्जाचं झालं आहे. या ठिकाणी खेळण्याचा अनुभव घेणं आणि सामना पाहण्याचा आनंद लुटणं ही नक्कीच पर्वणी ठरेल यात शंका नाही. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर हे मैदान अव्वल स्थानावर पोहोचेल याचा मला क्रीडाप्रेमी म्हणून आनंद आहे. या मैदानात प्रत्यक्ष उपस्थित राहून क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्याची प्रतिक्षा मला आहे. जाता जाता - मोदी नेहमी खंत व्यक्त करतात की, सार्वजनिक जीवनातून विनोद अलीकडं हरवत चालला आहे. त्यांना निराश न करण्याचा हा एक हलका प्रयत्न.
"मोदींचंच नाव द्यायचं होतं तर मग किमान ते भालाफेक, थाळी फेक, गोळाफेक वगैरे खेळांच्या मैदानांना तरी द्यायचं होतं? क्रिकेटच्या कशाला," असा प्रश्न मी एकाला केला तर तो उसळून मला म्हणाला, "बॅटने टोलवलेला चेंडू आणखी लांबवर जातो."