पुणे : एक दिवसीय सामन्यासाठी बुकिंना हवं तसं पिच बनवून देऊ असं सांगत, पिच फिक्सिंग शक्य असल्याचं पुण्याच्या मैदानाच्या पिच क्युरेटरनं म्हटलं आहे. इंडिया टुडेनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मॅचच्या आदल्या दिवशी बुकीचं सोंग घेत पत्रकार मैदानात गेल्याचं, पिचवर फिरल्याचं, क्युरेटरशी संवाद साधल्याचं दिसत आहेत. क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी पिच त्यांना हवं तसं बनवून देता येणं शक्य असल्याचं सांगताना दिसून आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळामध्ये फिक्सिंगच्या भुतानं डोकं वर काढलं आहे. दरम्यान, बीसीसीआयनं या वृत्ताची गांभीर्यानं दखल घेत पांडुरंग साळगावकर यांचे निलंबन केले.
क्रिकेटच्या सामन्याआधी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाही मैदानात प्रवेश देण्यात येत नाही, असं असताना बुकिंचा मुखवटा धारण केलेल्या पत्रकारांना प्रवेश कसा मिळाला, याआधीही असे प्रकार घडले होते का, याचा परिणाम आजच्या सामन्यावर होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या पत्रकारांनी साळगावकरांना विचारलं की दोन खेळाडुंना जास्त उसळी असणारी खेळपट्टी हवी आहे, ते शक्य आहे का, यावर बोलताना साळगावकरांनी ते शक्य असल्याचे सांगितले. या खेळपट्टीवर 337 ते 340 इतक्या धावा होतील आणि त्या पाठलाग करून करता येणं शक्य असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. बीसीसीआय व आयसीसीच्या नियमांना धाब्यावर बसवत क्युरेटरनं या पत्रकारांना खेळपट्टीची पाहणीदेखील करून दिली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभय आपटे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
भारत व न्यूझिलंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होत असून पहिला सामना भारताने गमावला आहे. दुसरा सामना आज पुण्यात अपेक्षित आहे तर तिसरा सामना राजकोटला होणार आहे. क्रिकेटला स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंग आदी कलंक लागले होते. त्यातुन बाहेर पडत असताना हा प्रकार घडल्यामुळे क्रीडा रसिक निराश झाले आहेत.
विशेष म्हणजे याच पुण्याच्या गहुंजे येथील मैदानातील खेळपट्टीच्या दर्जाविषयी आयसीसीनं याआधीही ताशेरे ओढले होते. फेब्रुवारीमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी सामना इथे झाला होता. भारताची दोन्ही डावांमध्ये 105 व 107 अशा धावसंख्येवर धुळधाण उडाली होती आणि तीन दिवसांत संपलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 333 धावांनी धूळ चारली होती. आता पुन्हा एकदा हे मैदान व खेळपट्टी चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आली आहे.