नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये केलेल्या ८९ धावांच्या खेळीच्या बळावर भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने १५ व्या ईएसपीएन क्रिकइन्फो सन्मान सोहळ्यात उत्कृष्ट कसोटी फलंदाजाचा पुरस्कार पटकाविला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा यंदाचा उत्कृष्ट कसोटी कर्णधार ठरला. गोलंदाजाचा पुरस्कार काइल जेमिसन याला देण्यात आला. भारताकडून पुरस्कार जिंकणारा पंत एकमेव खेळाडू आहे.
जेमिसनने ३१ धावात ५ फलंदाज बाद करीत भारताविरुद्ध न्यूझीलंडला विश्व कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून दिला होता. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत भारताला अशक्य असा विजय मिळवून दिला होता. विलियम्सनला सर्वाेत्कृष्ट कसोटी कर्णधाराच्या शर्यतीत विराट कोहली, बाबर आझम आणि ॲरोन फिंच यांच्याकडून आव्हान मिळाले होते. केनने आपल्या संघाला टी-२० विश्वचषकाचा उपविजेतादेखील बनविले.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन हा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनला. त्याने ८ कसोटीत ३७ गडी बाद केले. २०२१ मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा तो दुसरा गोलंदाज आहे. इंग्लंडच्या पुरुष संघासाठी हे वर्ष फारसे चांगले नव्हते, तरी या संघाने तीन पुरस्कार जिंकले. जोस बटलर याने शारजा येथे टी-२० विश्वचषकात ६७ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या होत्या. त्याला टी-२० तील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. वन डेत फखर झमा हा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा तर शाहीन आफ्रिदी याने गोलंदाजाचा पुरस्कार जिंकला.
पुरस्कार समितीत ज्युरी म्हणून डॅनियल व्हेटोरी, इयान बिशप, टॉम मूडी, अजीत आगरकर, लिझा स्थळेकर, डेरिल कलिनन, रसेल अर्नोल्ड, डेरेन गंगा, शहरीयार नफीस, बाजिद खान आणि मार्क निकोलस यांचा समावेश होता.
Web Title: Pant is the best Test batsman, Williamson is the best captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.