नवी दिल्ली: ‘युवा यष्टिरक्षक - फलंदाज ऋषभ पंतमध्ये विजयाची भूक आहे. भविष्यात तो टीम इंडियाचे यशस्वी नेतृत्व करेल,’ या शब्दात माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी दिल्लीच्या या खेळाडूची पाठ थोपटली. आयपीएलच्या १४व्या पर्वात नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त होताच पंतकडे दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व सोपविण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत अखेरच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे जखमी झाला होता.स्पोर्ट्स स्टारमधील आपल्या स्तंभात गावसकर म्हणाले, ‘युवा खेळाडू असलेल्या पंतमध्ये विजयाची भूक आहे. त्याच्या नेतृत्त्वात दिल्लीने यशस्वी वाटचाल केली. सहाव्या सामन्यापर्यंत वाटचाल करीत असताना पंतला नेतृत्त्वाबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक अँकर सामन्यानंतर त्याला नेतृत्त्वाबाबत प्रश्न करायचा. मला त्याच्यात विजयाची भूक जाणवते. नैसर्गिकदृष्ट्या त्याला वाटचाल करता आल्यास भविष्यत तो उत्कृष्ट कर्णधार बनू शकतो.’आयपीएलमध्ये यंदा पंतच्या नेतृत्त्वात दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले होते. दिल्लीने आठपैकी सहा सामने जिंकले. दोन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पंतने स्वत: आठ डावात २१३ धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १०७ षटकार ठोकले आहेत.
ऋषभ पंतने घेतला लसीचा पहिला डोसऋषभ पंतने गुरुवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. न्यूझीलंडविरुद्ध डब्ल्यूडीसी अंतिम सामना आणि त्यानंतरच्या इंग्लिश दौऱ्यासाठी २३ वर्षांच्या ऋषभला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर स्वत:चा फोटो शेअर करताना पंतने सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले. याआधी कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मुख्य कोच रवी शास्त्री यांनी लस घेतली.