सिंगापूर येथे सुरू असलेल्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिकेत नेपाळचा कर्णधार पारस खडकाने शनिवारी इतिहास घडवला. नेपाळ आणि सिंगापूर यांच्यातील लढतीत झालेला विक्रम टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच काय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही कर्णधाराला करता आलेला नाही. विशेष म्हणजे धावांचा पाठलाग करणारा सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून कोहलीची ओळख आहे. त्याने अनेकदा एकहाती खेळी करताना भारतात विजय मिळवून दिले आहेत. तरीही त्याला नेपाळच्या पारसने केलेला विक्रम करता आला नाही. महत्त्वाचे म्हणजे असा विक्रम करणारा पारस हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिलाच कर्णधार ठरला आहे.
नेपाळ आणि सिंगापूर यांच्यात झालेल्या सामन्यात यजमानांनी प्रथम फलंदाजी केली. कर्णधार टी डेव्हिडने ४४ चेंडूत ३ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ६४ धावा केल्या. त्याला एस चंद्रमोहन (३५) आणि जनक प्रकाश (२५) यांनी उत्तम साथ दिली. सिंगापूरने २० षटकांत ३ बाद १५१ धावा केल्या. नेपाळच्या करण केसीने २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात नेपाळने १६ षटकांत १ विकेट गमावत हे लक्ष्य पार केले. पारस आणि आरीफ शेख यांनी तुफान फटकेबाजी केली. आरीफने ३८ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. पारसने ५२ चेंडूत ७ चौकार आणि ९ खणखणीत षटकार खेचत नाबाद १०६ धावा केल्या. नेपाळकडून ट्वेंटी-२०त शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. शिवाय धावांचा पाठलाग करताना ट्वेंटी-२०त शतक करणाऱ्या पहिल्या कर्णधाराचा मानही त्याने पटकावला.
Web Title: Paras Khadka becomes the first captain in T20I history to score a hundred while chasing
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.