मुंबई : ‘शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु खेळ तुम्हाला आयुष्याचे अनेक पैलू शिकवतात. भारतीय सरकारच्या वतीने शालेय अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला जात असेल, तर याविषयी पालकांचे मत जाणून घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांना खेळांकडे वळविण्यासाठी शालेय स्तर मला योग्य वाटते,’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले. मुंबईत मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये धोनी बोलत होता. सोमवारी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमाचा भार ५० टक्क्यांनी कमी करुन खेळांच्या तासांना अधिक प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले होते. याविषयी धोनीला विचारले असता धोनी म्हणाला की, ‘मला अद्याप याविषयी काहीही माहित नाही. पण जर असा विचार होत असेल, तर याविषयी सर्वप्रथम पालकांचे मत जाणून घ्यावे लागेल. शालेय स्तरातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राकडे वळविण्यात मोलाचे योगदान देता येईल. विशेष करुन शारिरीक खेळ, मैदानी खेळ, इनडोअर खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले गेले पाहिजे. पालकांनीही खेळांकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.’ त्याचप्रमाणे, ‘आज अनेक विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत आहेत. मी २४ तास अभ्यास केला असता, तरी इतक्या गुणांचा विचारही करु शकलो नसतो. पण मी खेळामध्ये पुढे होतो आणि त्याकडे अधिक लक्ष दिल्यानेच मी यशस्वी कारकिर्द घडवू शकलो,’ असेही धोनीने म्हटले. धोनीने यावेळी क्रीडा क्षेत्राशी निगडीत असलेले मोफत मोबाइल अॅल रन अॅडम याचे अनावरण केले. यावेळी धोनीने क्रिकेटवरही गप्पा मारल्या. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याविषयी विचारले असता धोनीने फलंदाजांच्या कामगिरीबाबत बोलणे टाळले. त्याचवेळी गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. धोनी म्हणाला, ‘ कसोटी सामना जिंकण्यासाठी २० बळी घेणे आवश्यक असतात आणि आपण ते मिळवले, एवढंच मी सांगेल. फलंदाजी कशी झाली, तुम्ही ५ दिवस कसे खेळले यावर मी बोलणार नाही. जर तुम्ही २० बळी घेत असाल, तर तुम्ही सामना जिंकू शकता.’ इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यानंतर धोनीने सामन्यातील चेंडू आपल्याकडे घेतला होता आणि यावरुन धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. याविषयी विचारले असता त्याने म्हटले की, ‘त्या सामन्यात भारताला रिव्हर्स स्विंग करण्यात पुरेसे यश आले नव्हते आणि हे अपयश का आले याचा अभ्यास करण्यासाठी मी तो चेंडू मागितला होता. कारण पुढच्या वर्षी इंग्लंडमध्येच विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे आणि या दृष्टीने रिव्हर्स स्विंग महत्त्वाची बाब ठरणार आहे. जर प्रतिस्पर्धी संघ रिव्हर्स स्विंग करु शकतो, तर आपल्यालाही ती गोष्ट करता यायला पाहिजे. ५० षटकानंतर चेंडू खेळण्यायोग्य राहत नाही. त्यामुळेच मी आयसीसीकडे विनंती करुन हा चेंडू मागितला होता. हा चेंडू गोलंदाजी प्रशिक्षकांकडे सोपवून याचा अभ्यास करण्याचा माझा प्रयत्न होता. विराट कोहली सर्वोत्तम आहे. त्याने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले असून तो दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवल्याने मी खूप आनंदी आहे. गेल्या काही वर्षांपासून तो ज्याप्रकारे प्रत्येक ठिकाणी खेळत आहे ते अप्रतिम आहे. तो संघासाठी पुढाकार घेऊन खेळतोय आणि कर्णधाराकडून सर्वांना हीच अपेक्षा असते. - महेंद्रसिंग धोनी
- Cricket Buzz»
- बातम्या»
- शालेय अभ्यासक्रमबाबत पालकांचे मत जाणून घ्यावे लागेल - महेंद्रसिंग धोनी
शालेय अभ्यासक्रमबाबत पालकांचे मत जाणून घ्यावे लागेल - महेंद्रसिंग धोनी
‘शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु खेळ तुम्हाला आयुष्याचे अनेक पैलू शिकवतात. भारतीय सरकारच्या वतीने शालेय अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला जात असेल, तर याविषयी पालकांचे मत जाणून घ्यावे लागेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 6:11 PM