नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिलांच्या अंडर-19 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाची गोलंदाज पार्शवी चोप्रा हिने शानदार गोलंदाजी करून संघाला स्पर्धेतील चौथा विजय मिळवून दिला. रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी श्रीलंकेचा 7 विकेट राखून पराभव केला. खरं तर या आधीच्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव पत्करावा लागला होता.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 9 विकेट गमावून केवळ 59 धावा केल्या. महिलांच्या अंडर-19 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पूर्ण 20 षटके खेळून ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. कर्णधार विश्मी गुणरत्नेने सर्वाधिक 25 धावा केल्या, तर संघातील आठ खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.
भारताकडून पार्शवी चोप्राने सर्वाधिक 4 बळी पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे तिने 4 षटकांत केवळ 5 धावा देऊन 4 बळी घेण्याची किमया साधली. याशिवाय मनंत कश्यपने 2, तिताशू साधू आणि अर्चना देवी यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
7.2 षटकांत जिंकला सामनाभारतीय संघाने 7.2 षटकांत 3 विकेट गमावून विजय मिळवला. सौम्या तिवारीने 15 चेंडूत नाबाद 28 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार शेफाली वर्माने 15 धावा केल्या तर श्वेता सेहरावतेन 13 धावा करून भारताच्या विजयात हातभार लावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"