मुंबई : पार्थिव पटेलला आतापर्यंत भडकलेला तुम्ही पाहिला नसेल. पण माजी क्रिकेटपटूच्या एका वक्तव्याने पार्थिवची सटकली. आपल्यावर झालेल्या टीकेला पार्थिवने उत्तर देऊन माजी क्रिकेटपटूची बोलती बंद केल्याचे पाहायला मिळाले.
ही गोष्ट आयपीएलबाबत आहे. सध्याच्या घडीला सर्व संघ काही खेळाडूंना संघात कायम ठेवत आहेत, तर काहींना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुच्या संघाने पार्थिवला संघात कायम ठेवले असून तो यष्टीरक्षण करणार आहे. आरसीबीच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी टीका केली होती. या टीकेला पार्थिवने चोख उत्तर दिले आहे.
आरसीबीच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माइक हेसन यांनी ट्विटरवर संघाबाबत एक ट्विट केले. त्यानंतर जोन्स यांनी आरसीबीसाठी पार्थिव यष्टीरक्षण करणार का, असा सवाल उपस्थित केला. पार्थिवचे आता वय झाले आहे, असे जोन्स यांना सुचवायचे होते. त्यावर पार्थिवने ट्विट करत जोन्स यांना उत्तर दिले आहे. तुम्ही डग आऊटमध्ये शांतपणे बसावे, यासाठी माझी निवड करण्यात आली आहे, असे म्हणत जोन्स यांची बोलती बंद केली आहे.