ठळक मुद्देगुजरात आणि भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या पार्थिव पटेलला मुंबई इंडियन्समध्ये टॅलेंट स्काऊट पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच, संघासाठी नवीन प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याचं काम पार्थिवकडे असणार आहे
मुंबई - भारतीय संघाचा माजी खेळाडू पार्थिव पटेलने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर, दुसऱ्यादिवशी पार्थिवने आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघात एंट्री केलीय. पार्थिव पटेल यांनी आयपीएल संघातही आपली कामगिरी बजावली आहे. आयपीएलमध्ये 139 सामने पार्थिवने खेळले आहेत. त्यामध्ये पार्थिवने 22.6 च्या सरासरीने 2848 धावा केल्या असून 13 अर्धशतक ठोकले आहेत. आता मुंबई इंडियन्ससाठी पार्थिव काम करणार आहे.
गुजरात आणि भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या पार्थिव पटेलला मुंबई इंडियन्समध्ये टॅलेंट स्काऊट पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच, संघासाठी नवीन प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याचं काम पार्थिवकडे असणार आहे. पार्थिवला 2 दशकांपेक्षा अधिक क्रिकेटचा अनुभव असून राज्यस्तरीय ते आंतरराष्ट्रीय सामन्यात पार्थिवने आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे, पार्थिवचं मुंबई इंडियन्स संघात येणं आनंदाची बाब असल्याचं संघाचे मालक आकाश अंबानी यांन म्हटलंय. दरम्यान, पार्थिवने 2015 ते 2017 या काळात मुंबईसाठी 40 सामन्यांत क्रिकेट खेळले आहे. त्यामध्ये, 911 धावा केल्या असून 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
मुंबई इंडियन्सकडून मी 3 वर्षांसाठी क्रिकेट खेळलो असून आजही त्या आठवणी आहेत. आता, माझ्या आयुष्याच्या नव्या इंनिगला सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्सने दिलेल्या या जबाबदारीचे मी आभार मानतो, असे पार्थिवने म्हटले आहे.
टीम इंडियाचा सर्वात तरुण यष्टीरक्षक
35 वर्षीय पार्थिव पटेलने 18 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 25 कसोटी सामने, 38 एकदिवसीय सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून 194 क्रिकेट सामने खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे. पार्थिव पटेलने 2000 साली भारतीय क्रिकेट संघात आगमन केले होते. भारतासाठी कसोटी सामने खेळणारा सर्वात युवा यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेलच्या नावाची नोंद झाली आहे. त्यावेळी, पार्थिवचे वय 17 वर्षे 153 दिवस होते. पार्थिवचे करिअर सुरू असतानाच भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनीचे आगमन झाले. त्यानंतर पार्थिवला भारतीय संघात संधी मिळाली नाही. भारतीय संघात पहिला सामना खेळल्यानंतर दोन वर्षे 2 महिन्यांनी 2004 साली पार्थिवने गुजरातच्या संघासाठी रणजी सामना खेळला होता.
Web Title: Parthiv Patel's entry in Mumbai Indians after the exit of Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.