Corona Virus चा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्र सरकार तसेच विविध राज्य सरकार आपापल्या परीने खबरदारी घेत आहेत आणि नागरिकांना वेळोवेळी सूचनाही करत आहेत. कोरोना विषाणूचे आतापर्यंत देशात ६० हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने बुधवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याचा थेट फटका इंडियन प्रीमियर लीगला ( आयपीएल 2020) बसणार आहे आणि कदाचित त्यामुळे स्पर्धा रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा निर्णय होऊ शकतो.
कोरोना विषाणूचा फटका १०० हून अधिक देशांना बसल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं जगात महारोगराई पसरल्याचं घोषित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं १५ एप्रिलपर्यंत सगळे व्हिसा रद्द केले आहे. परदेशातून येणाऱ्या व्यक्तींपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राजदूत, संयुक्त राष्ट्र, महत्त्वाच्या प्रकल्पांवरील अधिकाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे आता आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंना सहभागी होता येणार नाही. प्रत्येक संघात अंतिम अकरामध्ये चार परदेशी असा आयपीएलचा नियम आहे. पण आता केंद्र सरकारने व्हिसाच नाकारल्याने परदेशी खेळाडू भारतात येऊ शकणार नाहीत. अशात स्पर्धा झालीच तर ती भारतीय खेळाडूंना घेऊनच पूर्ण करावी लागेल. त्यामुळे आयपीएलचा निम्मा टप्पा हा भारतीय खेळाडूंसोबतच पार पडेल. १५ एप्रिलनंतर केंद्र सरकारनेही व्हिसा देण्यास परवानगी दिल्यास परदेशी खेळाडू येऊ शकतील.
दरम्यान आयपीएल संदर्भात शनिवारी गव्हर्निंग काऊंसिलची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह हेही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत परदेशी खेळाडूंचा मुद्दाही चर्चिला जाणार आहे.
Web Title: The participation of overseas players in IPL 2020 has come under the scanner svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.