सिडनी : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा मनगटाचे हाड फ्रॅक्चर असताना इंग्लंडविरुद्ध ॲशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना खेळल्याचे वृत्त आहे. यामुळे पुढील महिन्यात आयोजित भारत दौऱ्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेस तो मुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मात्र कमिन्सच्या दुखापतीची अधिकृत माहिती दिलेली नाही. कमिन्सला दक्षिण आफ्रिका आणि भारत दौऱ्यात संघाचे नेतृत्व करायचे आहे. ही मालिका वनडे मालिकेआधी २२ सप्टेंबरपासून मोहालीत सुरू होईल. ‘सिडनी मॉर्निंग हेराॅल्ड’च्या वृत्तानुसार, वैद्यकीय पथकाने फ्रॅक्चरची शक्यता नाकारलेली नाही. मागच्या आठवड्यात ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी या वेगवान गोलंदाजाच्या मनगटाला दुखापत झाली. मनगटावर पट्टी बांधून त्याने कसोटी खेळणे सुरूच ठेवले.
मिशेल मार्शकडे नेतृत्व?भारताविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनलसह दोन महिने सहा कसोटी खेळल्यानंतर कमिन्सला विश्रांती मिळण्याची अपेक्षा आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढील आठवड्यात द. आफ्रिका आणि भारत दौऱ्यासाठी वनडे संघ जाहीर करेल. कमिन्सच्या अनुपस्थितीत मिशेल मार्श नेतृत्व करू शकतो.
असा असेल दौरा...ऑस्ट्रेलिया ३० ऑगस्टपासून दक्षिण आफ्रिकेचा दौरा करेल. त्यानंतर २२ सप्टेंबरपासून भारताविरुद्ध तीन वनडे खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ मोहालीत दाखल होणार आहे.