नवी दिल्ली-ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्वाची असणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम जवळपास ६ वर्षांच्या कालावधीनंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येत आहे. याआधी २०१७ साली ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यात चार सामन्यांच्या मालिकेत भारतानं २-१ ने विजय प्राप्त केला होता.
भारत दौऱ्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या संघात गोंधळ पाहायला मिळत आहे. कर्णधार पॅट कमिन्स याच्यामुळे पर्यावरण संबंधीच्या प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला चार कोटी ऑस्ट्रेलियन डॉलरचे (जवळपास २ अब्ज ३१ कोटी ९२ लाख ४१ हजार ९३२ रुपये) नुकसान सहन करावे लागले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वादाची सुरुवात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झाली होती. ज्यात पॅट कमिन्स यानं एलिंटा एनर्जीच्या जाहिरातीत सहभागी होण्यास नकार दिला होता.
कमिन्सनं आरोप फेटाळले"मी ज्या पदावर आहे ते पाहता विविध वादांनी घेरलो जातो. याचा सामना करावाच लागतो. जे तुम्हाला ओळखत नाहीत ते तुमच्याबाबत मत बनवतात. माझी पीढी आणि जवळचे लोक विविध गोष्टींबाबत खूप भावूक आहेत. कोणत्याही गोष्टींबाबत खुल्या मनानं विचार करणारे आहेत. पण काही लोक अजिबात पुढे जाण्याचा विचार करत नाहीत", असं पॅट कमिन्स म्हणाला.
"मी फक्त प्रयत्न करत राहतो आणि आपल्या जीवनात थोडा बदल करण्यासाठी खूप काही करत असतो. जर मी माझ्या कामानं क्रिकेट फॉर क्लायमेटच्या माध्यमाशी थोडं अंतर ठेवलं असेल तर त्यात त्रृटी शोधणाऱ्या लोकांना काहीच बोलू शकत नाही. माझं काम संघाचं नेतृत्व करणं आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणं हेच आहे", असं कमिन्स म्हणाला.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरापहिली कसोटी- ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी (नागपूर)दूसरी कसोटी- १७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी (दिल्ली)तिसरी कसोटी- १ ते ५ मार्च (धर्मशाला)चौथी कसोटी- ९ ते १३ मार्च (अहमदाबाद)