ind vs aus border gavaskar trophy : भारताविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने तयारीला सुरुवात केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षाच्या अखेरीस महत्त्वाची मालिका होणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. खरे तर मागील दोन मालिकांमध्ये भारतीय संघाने विजय संपादन केला होता. मात्र, यावेळी ऑस्ट्रेलिया भारताला वरचढ ठरेल असा विश्वास रिकी पाँटिंगने व्यक्त केला होता. ind vs aus ही पाच सामन्यांची कसोटी मालिका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे.
पॅट कमिन्सने २ महिन्यांसाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आगामी काळात भारताविरूद्ध होत असलेल्या मोठ्या मालिकेच्या दृष्टीने त्याने हा निर्णय घेतला. २२ नोव्हेंबरपासून बहुचर्चित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची मालिका खेळवली जाईल. कमिन्सने जुलै महिन्यात मेजर लीग क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सहा सामने खेळल्यानंतर त्याने माघार घेतली. पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतून त्याने माघार घेतली आहे. इंग्लंडच्या धरतीवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन ट्वेंटी-२० आणि पाच वन डे सामन्यांची मालिका होईल.
२ महिन्यांसाठी घेतला ब्रेक
कमिन्सने सांगितले की, सततच्या क्रिकेटमुळे मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी मागील १८ महिन्यांपासून सातत्याने खेळत आलो आहे, सातत्याने गोलंदाजी केली. विश्रांतीनंतर मी गोलंदाजीपासून पूर्णपणे दूर राहीन. सात-आठ आठवडे विश्रांती घेतल्याने शरीरही चांगली साथ देईल. एकूणच भारताविरूद्धची पराभवाची मालिका रोखण्यासाठी कमिन्सने स्वत:ला तंदुरूस्त ठेवण्यावर भर दिला आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा विजयरथ रोखण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियन संघासमोर असेल. २०१८-१९ मध्ये टीम इंडियाने कांगारूंच्या घरात जाऊन त्यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यावेळी टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते. पण, अशा कठीण परिस्थितही भारताने विजय साकारला. त्यानंतर २०२०-२१ मध्ये देखील टीम इंडियाने कांगारूंचा पराभव केला होता.