Ashes 2022, Pat Cummins heartwarming gesture to Usman Khawaja: पॅट कमिन्सने आपल्या कर्णधारपदाची अप्रतिम सुरूवात केली. त्याने ऑस्ट्रेलियाला इंग्लंडवर ४-०ने कसोटी मालिका विजय मिळवून दिला. टीम पेननंतर कर्णधारपद भुषवताना पॅट कमिन्सने केवळ संघाचं नेतृत्वच केलं नाही तर मालिकेत सर्वाधिक बळीदेखील घेतले. चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात इंग्लंडला यश आल्यानंतर पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाचं ऑस्ट्रेलियन संघाकडून सेलिब्रेशन सुरू असताना कर्णधार पॅट कमिन्सने जे केलं त्यामुळे त्याने सर्व क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली.
अॅशेस जिंकल्यानंतर ती ट्रॉफी पॅट कमिन्सला देण्यात आली. सेलिब्रेशनसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू शॅम्पने उडवण्याच्या तयारीत होते. पण त्याच वेळी कमिन्सला लक्षात आलं की उस्मान ख्वाजा या सेलिब्रेशनमध्ये सहभागी नाही. धार्मिक गोष्टींमुळे तो स्टेजपासून दूर उभा आहे. त्यावेळी कमिन्सने सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना शॅम्पेनच्या बाटल्या बाजूला ठेवायला सांगितल्या आणि उस्मान ख्वाजालाही सेलिब्रेशनमध्ये समाविष्ट करून घेतले.
पाहा व्हिडीओ-
पॅट कमिन्सची ही कृती अनेकांच्या मनाला भावली. सेलिब्रेशन पेक्षाही सर्वांना एकत्रितपणे घेऊन पुढे जाणं हे महत्त्वाचं असतं हे कमिन्सने कर्णधार म्हणून दाखवून दिलं.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पाचवी कसोटी १४६ धावांनी जिंकली. पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजयासाठी २७१ धावा हव्या होत्या. इंग्लंडची धावसंख्या बिनबाद ६८ अशी होती. पण नंतर अचानक त्यांच्या डावाला गळती लागली आणि अवघ्या ५६ धावांमध्ये इंग्लंडचा अख्खा संघच बाद झाला.