ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचा कर्णधार आणि गोलंदाज पॅट कमिन्स यांनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूवर लाळ लावण्यास घातलेल्या बंदीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर घालण्यात आलेल्या बंदीचा परिणाम इतका मोठा होईल असं वाटत नाही. तसंच त्यावर कायमस्वरुपी बंदी घातल्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी ती काही मोठी गोष्ट ठरणार नाही, असं पॅट कमिन्सनं म्हटलं आहे. मे 2020 मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर लाळेच्या वापरावर बंदी घातली. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्या तुलनेबाबतही ऑस्ट्रेलियन कर्णधारानं आपलं मत मांडलं आहे.
मेरीलेबोन क्रिकेट क्लबनं (MCC) नुकतंच सुधारित 2022 नियमावलीची घोषणा करून लाळेच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली, जी या वर्षी ऑक्टोबरमध्ये लागू होईल. लाळेचा वापर चेंडूच्या गतीवर कोणताही परिणाम होत नाही असा युक्तिवाद एमसीसीने केला आहे. चेंडूला चमक देण्यासाठी लाळेचा वापर करणे अयोग्य वर्तन मानले जाईल, असं एमसीसीनं म्हटलं आहे.
"चेंडू चमकवण्यासाठी आता लाळेचा वापर करता येणार नाही याचा फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. त्याचा इतका मोठा परिणाम होईल असं नाही. घामाच्या वापरावर बंदी घातलेली नाही. त्यामुळे ती काही मोठी गोष्ट नाही", असं सध्या जगातील अव्वल गोलंदाजांपैकी एक असलेल्या कमिन्सनं पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १९६ धावांची खेळी करणारा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची अनेकदा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीशी तुलना केली जाते. दोघांच्या तुलनेबद्दल विचारले असता कमिन्सनं महत्वाचं विधान केलं. "ते दोघंही खरोखरच परिपूर्ण फलंदाज आहेत, तुम्ही कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळलात तरी ते तुम्हाला आव्हान देतील. दोघंही उत्कृष्ट खेळाडू आहेत. दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनेकदा शतकं ठोकली आहेत", असं पॅट कमिन्स म्हणाला.
'केकेआर'बाबत केलं महत्वाचं विधानकमिन्स 2019 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. त्यानंतर त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 15.50 कोटींना विकत घेतले. या लीगच्या आगामी हंगामात तो पुन्हा एकदा कोलकाता संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तो म्हणाला, " मी खूप उत्साही आहे. संघाला बहुतांश खेळाडूंना एकत्र ठेवण्यात यश आले आहे. बहुतेक खेळाडू आणि सदस्य एकमेकांना खरोखर चांगले ओळखतात"
श्रेयस खूप शांत व्यक्ती- कमिन्सकेकेआरने भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. कमिन्सने आयपीएलच्या 2017 हंगामात त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती. "श्रेयस आणि मी दिल्लीकडून (डेअर डेव्हिल्स) खेळलो आहोत. तो खूप शांत व्यक्ती आहे आणि या क्षणी तो जबरदस्त फॉर्मात आहे", असं कमिन्स म्हणाला.