नवी दिल्ली : अखेर भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील टी-२० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील काही दिवसांपासून खेळाडूंच्या रखडलेल्या व्हिसाला अखेर अमेरिकेकडून मंजुरी देण्यात आली. गयानाच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे दोन्ही संघांना हा व्हिसा मिळाला आहे.
म्हणजेच आता पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवले जातील. तसेच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मादेखील फिट झाला आहे.
त्यामुळे आगामी दोन टी-२० सामन्यात तो पुन्हा एकदा भारतीय संघाची धुरा सांभाळेल. पहिले ३ सामने विंडीजच्या धरतीवर पार पडल्यानंतर आता उर्वरित दोन सामने अनुक्रमे ६ आणि ७ ऑगस्ट रोजी फ्लोरिडा येथे खेळवले जातील. दोन्ही संघातील खेळाडूंचा व्हिसा मंजूर होण्यास विलंब लागल्याने या सामन्यांविषयी साशंकता होती.क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि भारतीय खेळाडूंसह वेस्टइंडिजच्या खेळाडूंना आणि स्टाफला व्हिसा मिळाला. यासाठी वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाने राष्ट्राध्यक्षांचे आभार देखील मानले.