- ललित झांबरे
आयपीएल (IPl 2021) असेल की कोणताही टी-20 सामना असेल, त्यात षटकामागे 8 ते 10 धावा निघणे ही तर आम बाब. अखेर अखेरच्या षटकांमध्ये तर 12 ते 16 धावा होणे हे नेहमीचेच. षटकार- चौकारांची बरसात सवयीचीच, अशा आयपीएलच्या सामन्यात जर अखेरच्या षटकांत एकही धाव निघाली नसेल किंवा एखादीच धाव निघाली असेल तर ...विश्वास बसणे अवघड आहे पण विश्वास ठेवायला लागेल कारण असे खरोखर घडलेले आहे.
अगदी ताजे उदाहरण राजस्थान रॉयल्सच्या (RR) कार्तिक त्यागीचे (Karthik Tyagi) आहे. त्याने मंगळवार, 21 रोजी पंजाब किंग्जच्या फलंदाजांना अखेरच्या षटकात फक्त एकच धाव घेऊ दिली. अशीच अखेरच्या षटकात फक्त एकच धाव देण्याची कामगिरी 2009 मध्ये डरबनच्या मैदानावर राजस्थान रॉयल्ससाठी मुनाफ पटेलनेसुध्दा (Munaf Patel) केली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना त्याने नाकाम ठरवले होते.
त्यागी व पटेलशिवाय तिसरा असा गोलंदाज आहे जयदेव उनाडकट (Jaydev Unadkut) ज्याने 6 मे 2017 रोजी रायजिंग पुणे संघासाठी हैदराबाद इथे अशी कामगिरी केली होती. त्यावेळी सामन्यातील शेवटच्या षटकात त्याने सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांना धाव तर फक्त एकच घेऊ दिली होती, शिवाय विपूल शर्मा, राशिद खान व भुवनेश्वर कुमार यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करून हॅटट्रिकसुद्धा केली होती.
त्यागी, उनाडकट आणि पटेल यांनी सामन्याच्या अखेरच्या षटकात किमान एक धाव तरी दिली होती, पण एक गोलंदाज असा आहे ज्याने अशा षटकात एक सुद्धा धाव दिली नव्हती. निर्धाव षटक, ते सुद्धा सामन्यातील शेवटचे षटक, टाकले होते. आयपीएलच्या इतिहासातील तो एकमेव गोलंदाज म्हणजे...किंग्ज इलेव्हन पंजाबचा इरफान पठाण (Irfan Pathan). 25 एप्रिल 2008 रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मोहाली इथे त्याने ही कमाल कामगिरी केली होती. आणि त्यावेळी इरफानसामोरचा फलंदाज होता आशिष नेहरा. त्या षटकातील सहा पैकी पाच चेंडू नेहराने बॅटने खेळूनसुद्धा काढले होते पण धाव काही निघाली नव्हती आणि तसा प्रयत्नसुद्धा झाला नव्हता. कारण त्या अखेरच्या षटकाआधीच मुंबई इंडियन्सचा पराभव होणार हे स्पष्ट झालेले होते.
सांगायची गरज नाही की, ज्या चार गोलंदाजांनी धाव करून तर दाखव...असे अखेरच्या षटकात फलंदाजांना चॅलेंज दिले ते चारही सामने त्यांच्या संघांनी जिंकले.