Pakistan Men's Central Contract List : आगामी वन डे विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना खुशखबर दिली आहे. पीसीसीबीने सेंट्रल कराराची यादी जाहीर केली असून कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांचा 'भाव' वाढवला आहे. नव्या कराराच्या यादीत पाकिस्तानी खेळाडूंची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. बाबर आझमशिवाय मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी अ श्रेणी मध्ये आहेत.
दरम्याम, ब श्रेणीमध्ये फखर जमान, हारिस रौफ, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, नसीम शाह आणि शादाब खान यांचा समावेश आहे. याशिवाय क श्रेणीमध्ये दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे. या यादीत इमाद वसीम आणि अब्दुल्ला शफीक यांचा समावेश आहे. तर ड श्रेणीमध्ये फहीम अश्रफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम ज्युनिअर, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहनवाज दहानी, शान मसूद, उसामा मीर आणि जमान खान यांचा समावेश आहे.
कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर वन डे फॉरमॅटमधील खेळाडूंच्या पगारात २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय ट्वेंटी-२० खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात १२.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी पीसीबीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. खरं तर पाकिस्तानी खेळाडूंनी मागील चार महिन्यांपासून मॅच फी मिळाली नसल्याची तक्रार केली होती.