Join us  

मोहम्मद रिझवान ठरला 2021तील Most Valuable Cricketer; अविश्वसनीय कामगिरीमुळे मिळाला पुरस्कार, टीम इंडियाला धक्के दिले म्हणून आफ्रिदीचाही गौरव

पाकिस्तानचा सलामवीर मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan ) यानं खऱ्या अर्थानं 2021 वर्ष गाजवलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाच न करता आलेले विक्रम रिझवाननं मागच्या वर्षी केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 4:10 PM

Open in App

पाकिस्तानचा सलामवीर मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan ) यानं खऱ्या अर्थानं 2021 वर्ष गाजवलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाच न करता आलेले विक्रम रिझवाननं मागच्या वर्षी केले. त्यामुळेच आयसीसीनं  ट्वेंटी-20 क्रिकेटर ऑफ दी इयर ( ICC Men’s T20I Cricketer of the Year) साठी त्याला नामांकन दिले. त्यासोबत सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या नामांकनात पाकिस्तानचा शाहिन शाह आफ्रिदी व मोहम्मद रिझवान यांचा समावेश आहे. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) आज त्यांचे पुरस्कार जाहीर केले आणि त्यात रिझवाननं Most Valuable Cricketer of the Year चा पुरस्कार पटकावला. 

मोहम्मद रिझवाननं मागील वर्षात ४४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५६.३२च्या सरासरीनं १९१५ धावा केल्या आहेत. त्यात २ शतकांचा समावेश आहे आणि यष्टिंमागे त्यानं ५६ बळी टिपले आहेत. त्यानं कसोटीत ४५५, वन डे त  १३४ आणि ट्वेंटी-२०त १३२६ अशा धावा केल्या आहेत. या पुरस्काराच्या शर्यतीत बाबर आजम, हसन अली व शाहीन शाह आफ्रिदी हेही होते. पण, रिझवाननं बाजी मारली. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १००० धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. 

''माझ्यासाठी हे अविश्वसनीय वर्ष ठरले, सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केली आणि त्यानंतर वाढलेला आत्मविश्वास संपूर्ण वर्ष कायम राखून खेळ केला.  माझ्या या यशात आमच्या गोलंदाजांचेही मोठे योगदान आहे. त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली म्हणूनच फलंदाज दडपणाशिवाय खेळू शकले,''असे रिझवान म्हणाला.   

हसन अलीनं सर्वोत्तम कसोटीपटूचा मान पटकावला. त्यानं मागील वर्षात ८ कसोटीत ४१ विकेट्स घेतल्या आणि त्यात पाच वेळा त्यानं डावात चार विकेट्स घेण्याचा व एक वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याला वन डे क्रिकेटपटूचा मान मिळालाय त्यानं सहा वन डे सामन्यांत दोन शतकांसह ४०५ धावा केल्या आहेत. महिलांमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा मान निदा दार हिनं पटकावला. तिनं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत मिळून ४५८ धावा व ११ विकेट्स घेतल्या. शाहिन शाह आफ्रिदीला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या धमाकेदार कामगिरीसाठी ( ३-३१) Impactful Performance of the Year हा पुरस्कार देण्यात आला. मोहम्मद वासीम ज्युनियर हा उदयोन्मुख खेळाडू ठरला.   

 

सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफीसाठी रिझवानला कडवी टक्कर सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या नामांकनात पाकिस्तानचा शाहिन शाह आफ्रिदी व मोहम्मद रिझवान यांचा समावेश आहे. त्यांना इंग्लंडचा कर्णधार जो रूट व न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांची टक्कर मिळणार आहे. जो रूटनं २०२१मध्ये १८ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५८.३७च्या सरासरीनं १८५५ धावा केल्या आहेत आणि त्यात ६ शतकांचा समावेश आहे. शाहिन आफ्रिदीनं ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ७८ विकेट्स घेतल्या आहेत आणि ६ बाद ५१ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.  केन विलियम्सननं १६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १ शतकासह ४३.३१च्या सरासरीनं ६९३ धावा केल्या आहेत. 

टॅग्स :पाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बाबर आजम
Open in App