Join us  

“भारतात विश्वचषक खेळण्याचा अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल”

नवे पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी घेतली नरमाईची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 9:14 AM

Open in App

इस्लामाबाद: प्रशासक बदलताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नरमाईची भूमिका घेतलेली दिसते. रमीझ राजा यांचे स्थान घेणारे नवे पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी भारतात वन डे विश्वचषक खेळण्याच्या प्रश्नावर नमते घेत विश्वचषकात खेळण्याचा निर्णय सरकार घेईल, असे मंगळवारी स्पष्ट केले.

ज्यामुळे संघर्ष होईल, असे वक्तव्य करण्याचे तसेच पाऊल उचलण्याचे आपण टाळणार असल्याचे संकेत सेठी यांनी दिले.  आशिया चषक २०२३ च्या यजमानपदावरून निर्माण झालेल्या वादावर सेठी म्हणाले, ‘मी आशियाई क्रिकेट कौन्सिलचे मत जाणून घेणार आहे. आम्हाला सर्वांसोबत क्रिकेट खेळायचे आहे. तणाव निर्माण होईल, असे कुठलेही पाऊल उचलणार नाही.’

पाकिस्तान संघ भारतात विश्वचषक खेळणार का? या प्रश्नावर सेठी म्हणाले, ‘बोर्ड पुढच्यावर्षी होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी भारत दौऱ्यावर सरकारच्या निर्णयाचे पालन करेल.’   सहा दिवसांआधी सेठी यांनी रमीझ यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. पदाची सूत्रे स्वीकारताच त्यांनी भारतासोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत.

याआधी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी २०२३ चा आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित होईल, असे म्हटले होते. त्यावर तत्कालीन पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांनी यजमानपद हिसकावल्यास पाकिस्तान आशिया चषक खेळणार नाही, अशी धमकी दिली होती.  आशिया चषकाचे आयोजन २०२३ ला पाकिस्तानात आणि वन डे विश्वचषकाचे आयोजन ऑक्टोबरमध्ये भारतात होणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पाकिस्तान
Open in App