आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघ गेल्या बुधवारी भारतात पोहोचला आहे. पाकिस्तानचा संघ तब्बल सात वर्षांनंतर भारतात आला आहे. पाकिस्तानी संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर चांगलीच गर्दी झाली होती, त्यामुळे खेळाडूंनाही आनंद झाला आणि त्यांनी सोशल मीडियावरही हा आनंद व्यक्त केला. यापूर्वी 2016 मध्ये टी-20 वर्ल्ड कपदरम्यान पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. दरम्यान, पीसीबी प्रमुख झका अशरफ यांच्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे.
पाकिस्तान नेहमीच बेताल वक्तव्यांसाठी ओळखला जातो. एकीकडे पाकिस्तानी खेळाडू भारतातील सुविधा आणि आदरातिथ्याने खूश आहेत, तर दुसरीकडे पीसीबीचे प्रमुख झका अशरफ यांनी भारताला शत्रू देश असल्याचे म्हटले आहे. झका अशरफ यांनी मीडियाशी संवाद साधत पाकिस्तानी खेळाडूंच्या वाढलेल्या पगाराबद्दल भाष्य केले. तसेच, ते म्हणाले की, "प्रेमाने आणि मोहम्मदने आम्ही खेळाडूंना इतके पैसे दिले आहेत, कदाचित इतिहासात कधीच खेळाडूंना इतके पैसे मिळाले नसतील. आमच्या खेळाडूंचे मनोबल उंचावले पाहिजे हाच माझा उद्देश होता. ते कोणत्याही शत्रू देशात किंवा स्पर्धा आयोजित केलेल्या कोणत्याही ठिकाणी गेल्यास त्यांना चांगली कामगिरी करता, यावी यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे."
दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंनी भारतात येऊन स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळण्यास सुरुवात केली आहे. हा संघ हैदराबादमध्ये दीर्घकाळ राहणार असून, तेथे खेळाडूंसाठी चांगली सोय करण्यात आली आहे. तसेच, कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. न्यूझीलंडसोबतच्या सराव सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ 3 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे. यानंतर 6 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने पाकिस्तान मुख्य स्पर्धेत पदार्पण करणार आहे. यानंतर संघाचा सामना 10 ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे.
पाकिस्तानचा तिसरा सामना मोठा असणार आहे, तो भारतासोबत 14 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतीय आणि पाकिस्तानी चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. दोन्ही संघ आयसीसी किंवा इतर कोणत्याही मोठ्या स्पर्धेतही एकमेकांसमोर असतात. यावेळी भारतात वर्ल्ड कप स्पर्धा होत आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला आहे. याआधी 2016 मध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. म्हणजेच पाकिस्तानचा संघ 7 वर्षांनी भारतात आला आहे.