पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) सोमवारी मोठी घोषणा केली. मागील वर्षापासून पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय दौरे झालेच नव्हते, परंतु १० वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतले. पण, या वर्षात न्यूझीलंड व इंग्लंड यांनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौरा स्थगित केला. किवी संघ तर सामन्याच्या दिशवीच मायदेशासाठी रवाना झाले. त्यामुळे पुन्हा पाकिस्तानवर संकट ओढावतंय की काय, असा प्रश्न उपस्थित झाला. पण, PCBनं आज मोठी घोषणा केली, परंतु त्यांच्या घोषणेमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे.
PCBनं पुढील दोन वर्षांतील घरच्या मैदानावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले.
- मार्च-एप्रिल २०२२ - ऑस्ट्रेलिया तीन कसोटी, तीन वन डे व एक ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी येणार
- जून २०२२ - वेस्ट इंडिजचा संघ तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार
- सप्टेंबर २०२२- इंग्लंडचा संघ सात ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानात येणार
- डिसेंबर २०२२- इंग्लंडचा संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार
- डिसेंबर-जानेवारी २०२२-२३ - न्यूझीलंडचा संघ दोन कसोटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार
- एप्रिल २०२३ - न्यूझीलंडचा संघ पाच वन डे व पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार
- २०२३ - आशिया चषक ( वन डे )
- २०२५ - आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी
आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद व २०२५च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाल्यानं भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जावं लागेल. आता BCCI यावर काय निर्णय घेते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचं विधान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबद्दल येणाऱ्या काळात निर्णय घेण्यात येईल. आंतरराष्ट्रीय संघांसाठी शेजारी देशाचा दौरा करण्यासाठी अनेक सुरक्षेचे मुद्दे आहेत, असं क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते.