कराची - राजकीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली आहे, तसेच चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५च्या यजमानपदाच्या करारपत्रावर स्वाक्षरी करावी यासाठीही पीसीबीने आग्रह धरला आहे.
पीसीबीच्या सूत्रांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, आयसीसीने पाकिस्तानला यजमान म्हणून निवडले आहे; पण आयसीसीने आतापर्यंत यजमानपदाच्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. पीसीबी अध्यक्ष जका अशरफ आणि मुख्य परिचालन अधिकारी सलमान नसीर यांनी २०२५ मध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्राॅफीच्या यजमानपदाबाबत चर्चा करण्यासाठी अहमदाबादमध्ये आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची भेट घेतली होती, असा खुलासाही या सूत्राने केला आहे.