Haris Rauf Pakistan, Tri Series : पाकिस्तानी संघाच्या चिंतेच मोठी वाढ झाली आहे. सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याशी तिरंगी मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानने जाहीर केलेल्या एकदिवसीय संघात बदल करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. हॅरिस रौफला दुखापतीमुळे संघातून वगळावे लगाले असल्याने पाकिस्तानला हा बदल करावा लागला आहे. तिरंगी मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यात वेगवान गोलंदाज रौफला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी आता आकिफ जावेदला पाकिस्तानी संघात स्थान मिळाले आहे. तसेच, रौफ हा पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी तो तंदुरुस्त व्हावा या उद्देशाने त्याला मालिकेतून विश्रांती दिली गेल्याचे बोलले जात आहे.
हॅरिसच्या जागी आकिफ जावेदला संधी
२४ वर्षीय आकिब जावेद हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याला पहिल्यांदाच पाकिस्तानी संघात संधी मिळाली आहे. त्याने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत त्याला तिरंगी मालिकेत पदार्पणाची संधी मिळू शकते. डावखुरा वेगवान गोलंदाज आकिफ जावेदला देशांतर्गत क्रिकेटमध्ये ३० लिस्ट ए सामन्यांचा अनुभव आहे. त्यात त्याने ९ च्या सरासरीने गोलंदाजी करत ५४ विकेट्स घेतल्या आहेत.
जावेद आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दिसणार नाही!
तिरंगी मालिकेतील पाकिस्तानचा पुढील सामना १२ फेब्रुवारीला आहे. तिरंगी मालिकेतील न्यूझीलंड विरूद्धचा पहिला सामना गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी 'करो वा मरो' पद्धतीची असणार आहे. त्या सामन्यात आकिफ जावेदला संधी मिळणार नाही हे निश्चित आहे. कारण पाकिस्तानने आपली प्लेइंग ११ आधीच जाहीर केली आहे. त्यामुळे कदाचित तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात त्याला संधी दिली जाऊ शकेल.