पाकिस्तान क्रिकेटमधला गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकदिवसीय विश्वचषक २०२३ पासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. कर्णधार आणि प्रशिक्षक सर्वांना काढून टाकण्यात आले. नवीन लोकांना नियुक्त देखील करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्षही बदलण्यात आले. मात्र तरी देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डमधील वाद सुरुच आहे.
संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर ४ वर्षांसाठी नियुक्त करण्यात आलेला संचालक मोहम्मद हाफिजला २ महिन्यांतच हटवण्यात आले. यानंतर संतापलेल्या हाफिजने आता उघडपणे पीसीबीला सर्वांचा पर्दाफाश करण्याची धमकी दिली आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाची कामगिरी खराब झाली होती. या संघाला विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठता आली नाही.
विश्वचषकानंतर हाफिजची संघ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र तरीही पाकिस्तान संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. यानंतरही, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानचा ३-० असा पराभव आणि टी-२० मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध ४-१ असा पराभव झाला होता. आता संचालक पदावरून हटवल्यानंतर हाफिजने असा खुलासा केला की, त्याला चार वर्षांसाठी कराराची ऑफर देण्यात आली होती. मात्र नंतर ती दोन महिन्यांमध्येच संपवण्यात आली.
सोशल मीडियाद्वारे धमकी-
हाफिज म्हणाला की, तो सर्व गैर-क्रिकेट तथ्ये देखील उघड करेल ज्यामुळे संघाच्या खराब कामगिरीला मदत झाली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'मी नेहमीच पाकिस्तानला प्राधान्य दिले आहे आणि सन्मान आणि अभिमानाने त्याचे प्रतिनिधित्व केले आहे. सकारात्मक सुधारणा करण्यासाठी मी पीसीबी संचालक म्हणून नवीन भूमिका स्वीकारली, परंतु दुर्दैवाने पीसीबीने प्रस्तावित केलेला माझा चार वर्षांचा कार्यकाळ दोन महिन्यांत संपुष्टात आला. पाकिस्तान क्रिकेटच्या भविष्यासाठी शुभेच्छा, असं हाफिज म्हणाले.